कश्मीरे संस्कृतम्|

कश्मीरचा इतिहास आणि प्राचीनता उलगडणारी रंजक अशी लेखमाला ! कश्मीर आणि संस्कृत भाषा यांचा घनिष्ठ संबंध आणि संस्कृत साहित्यामध्ये, स्थापत्यकलेमध्ये कश्मीरी संशोधकांचे, अभ्यासकांचे अमूल्य योगदान यांचा धांदोळा घेणारी लेखमाला!

कश्मीरे संस्कृतम् – ५

डॉ. समीरा गुजर -जोशी |  June 16, 2022 |  0 Comment | 3 Min.

जनमानसामध्ये कश्मीरचे सम्राट ललितादित्य, सम्राट जयापीड यांच्यासारखे राजे तितकेसे प्रसिद्ध नाहीत. आपल्याला शिकवलेल्या इतिहासात, भारतात छोटी–छोटी राज्ये होती हे वारंवार सांगितले जाते; पण त्यांच्यातले दिग्विजयी राजे, एक राजा आणि त्याचे मांडलिक राजे या परंपरेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले दिसून येते. यांच्याविषयी संस्कृत साहित्यात मात्र पदोपदी असंख्य संदर्भ येतात. अर्थात हा एक वेगळा विषय आहे. कश्मीर आणि संस्कृत यांचा अन्योन्य संबंध समजून घेताना आपण या दोन सम्राटांकडे वळलो; कारण त्यांनी साहित्याला आणि कलेला प्रोत्साहन दिले. त्यांचे हे अमूल्य योगदान समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही म्हणून!

 

आज मी सम्राट जयापीडाच्या इतिहासाच्या ज्या भागाविषयी लिहिणार आहे तो नक्कीच धक्कादायक आहे. पण मी तो रंजक आणि थरारक आहे यासाठी इथे सांगत नसून आजचा कश्मीर समजून घेताना हा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे म्हणूनच अपरिहार्यपणे मांडत आहे.

 

दुस-या दिग्विजयासाठी जेव्हा जयापीड कश्मीरबाहेर पडला तेव्हा त्याने नेपाळच्या राजाला नमवले, स्त्रीराज्य (आसाम) काबीज केले. कश्मीरच्या सीमा समुद्राला टेकवत तो आजोबा ललितादित्याप्रमाणेच चक्रवर्ती सम्राट झाला. खूप मोठा खजिना घेऊन तो कश्मीरला परतला. तशात त्याला तांब्याची नवी खाण सापडली. त्याने लगेच स्वतःचे नाव कोरलेली नाणी पाडायला घेतली. सत्तेचा कैफ चढू लागला होता. त्याने प्रतिज्ञा केली मी १०० कोटीपेक्षा एक नाणे कमी पाडतो. ज्या राजाला मला पराभूत करायचे असेल त्याने १०० कोटी नाणी पाडावी. इथूनच जयापीड पर्व २ ला सुरवात होते.

 

सरस्वती आणि लक्ष्मीच्या चिरंतन संघर्षात ‘लक्ष्मीचे‘ पारडे जड ठरले. सत्तेचा दिमाख इतका डोळे दिपवणारा होता की त्यापुढे अंधारात वाट दाखविणारी विद्येची ज्योत गरजेची उरली नाही. किंबहुना, सत्तेच्या वादळात ती ज्योत टिकलीच नाही. विनयादित्य म्हणून स्वतःला मिरविणा–या राजाकडे ना शिक्षण या अर्थी ‘विनय‘ उरला ना नम्रता या अर्थी! सत्तेचा तक्षक त्याला दंश करुन गेला आणि विष त्याच्या अंगात भिनू लागले. मंत्र्यांनी त्याचे कान भरले की इतर राज्यांवर स्वारी करण्याची गरजच काय? आपल्या प्रजेकडेच भरपूर पैसा आहे. मग जनतेचा छळ सुरू झाला. राजाचे विरोधक मारले जाऊ लागले. उद्भटासारख्या विद्वानाला दर दिवशी एक लाख मुद्रांचे वेतन देऊन सन्मान करणा–या त्याच जयापीडाच्या राज्यात पंडित भयभीत झाले. कित्येकजण कश्मीर सोडून पळाले. जयापीडाने एका दिवसात ९९ ब्राह्मणांची हत्या करा असा हुकूम सोडला. हे वाचून आपण सुन्न होतो. जयापीडासारख्या राजाने असे वागणे ही सत्तांध होण्याची परिसीमा आहे.

 

इतिहासाच्या या काळ्याकूट्ट पर्वातही समाधानाची बाब ही की ब्राह्मण स्वस्थ बसले नाही. इथे लक्षात घेऊया की ब्राह्मण हा शब्द जातिवाचक नसून विचारवंत या अर्थी आहे. समाजात इतक्या पराकोटीचा अन्याय होताना जर विचारवंत स्वस्थ बसणार असेल तर ‘पढतमूर्ख‘ सोडून त्याला दुसरी काय उपाधी देणार? पण इतिहासातील ही घटना अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे. पुढे येणारा हा संपूर्ण संवादच ऐतिहासिक आहे. राजाचे विद्वानांची गळचेपी करण्याचे चालवलेले धोरण बघून ब्राह्मणांचा एक चमू राजाकडे दाद मागायला गेला. त्यांनी राजाला विचारले, ” मनु काय, मांधाता काय, राम काय किंवा आणखी कोणताही राजा घे. कोणत्याही राज्यात ब्राह्मणांचा असा अपमान झालेला नाही.” राजानेही मग्रुरीने उत्तर दिले, “दुस–याच्या भिक्षेवर जगणारे आयतखोर ब्राह्मण तुम्ही! आव तर असा आणत आहात की महान ऋषीच आहात. कोण आहात तुम्ही, विश्वामित्र, वसिष्ठ की अगस्त्य?” ब्राह्मणांनीही उत्तर दिले की तू जर राजा हरिश्चंद्र, त्रिशंकू किंवा राजा नहुष असशील तर आम्हीही महान ऋषी आहोत. त्यावर राजा हसून म्हणाला, “विश्वामित्राच्या शापाने हरीश्चंद्र नष्ट झाला. तुझ्या रागाने तू माझे काय वाकडे करणार?” त्यावर एक ब्राह्मण उत्तरला की माझ्या शापाने तुझ्यावरही ब्रह्मदंड आदळेल आणि खरोखरच राजाच्या अंगावर कमानीचा काही भाग कोसळला. राजा जबर जखमी झाला आणि पाच दिवस वेदना सोसत शेवटी त्याने प्राण सोडला. या घटनेच्या तपशीलावर चर्चा करता येईल. कमान पडली की पाडण्यात आली, वगैरे प्रश्न उपस्थित करता येतील; पण महत्त्वाचे हे की राजाच्या अन्यायाविरुद्ध विचारवंतांनी वाचा फोडली आणि ती तशी फोडायला हवीच.

 

जयापीडाने ३१ वर्षे राज्य केले. त्यापैकी शेवटची ३ ‌वर्षे अशी तमोयुगाची होती, सत्तेच्या माजाची ठरली. शासनकर्त्याकडून  होणा–या चुकीला शासन हे होतेच आणि ते जनता करते, तिच्यावतीने विचारवंत ते घडवून आणतात याची साक्ष ही घटना देते; पण इतिहासाच्या या पानांकडून सत्ताधीश काही धडा घेतात का? इतिहास दोन्ही हात उंचावून, ओरडून सांगतो आहे, पानोपानी हेच लिहिले आहे की सत्ताधीशांनो, तुम्ही कुणामुळे सत्तेवर आहात हे विसरु नका. सत्ता तुमच्या हाती असली तरी ती तुमच्यासाठी नाही. विचारवंत, ज्ञानी लोक यांची कदर राखणे, त्यांचा सल्ला घेणे हे अपरिहार्य आहे.  कश्मीरमधील विद्वानांचे हे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे की कश्मीरच्या इतिहासात या राजकीय उलथापालथी सतत होत राहिल्या. कधी राजसत्तेचा आधार मिळाला, कधी नाही; पण त्यांची ज्ञानसाधना त्यांनी अखंड सुरु ठेवली. राजा जयापीड ते राजा अवंतिवर्मा हा काळ कश्मीरसाठी अंधकारमय होता. विलासी राजे, भ्रष्ट मंत्री आणि प्रामाणिक लोकांच्या हतबलतेचा तो काळ आहे. त्यातही ज्ञानार्जनाचे काम सुरु राहिले आहे. ही परंपरा अखंड ठेवल्यामुळेच अवन्तिवर्माच्या दरबारात (इ. स. ८५५–८८३) आनंदवर्धनासारखा विद्वान निपजतो.

 

आजही कश्मीरच्या उत्कर्षाचे गणित हे शाळेतील फळ्यावर सुटणार आहे. या प्रदेशाच्या उत्कर्षासाठी राजकीय धोरण हे पूर्णपणे तेथील जनतेच्या हिताचा विचार करणारे हवे. राजा अवंतिवर्मा हेच करून दाखवतो याचे कारण त्याच्याकडे  विचारांची भक्कम बैठक आहे. अवंतिवर्मा जेव्हा गादीवर आला तेव्हा राजसत्तेकडे, त्या ऐश्वर्याकडे, राजलक्ष्मीकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन विलक्षण आहे. तो म्हणतो हे जे राजदागिने मी घालणार आहे, ते दुस–या राजाच्या मृतदेहावरुन काढलेले आहेत. हे पाणी पिण्याचे सोन्याचे पात्र, ही सोन्याचांदीची भांडी हे सारं आधीच्या राजांनी उष्टावलेले आहे. त्यांच्या राहिलेल्या इच्छा–आकांक्षा, त्यांच्या भोवतीचे तळतळाट यामुळे हे सगळे डागाळलेले, अपवित्र नाही का? या राजलक्ष्मीवर मी कसा भरवसा टाकू? तिचा जन्मच झाला तो समुद्रमंथनाच्या वेळी, अप्सरांसमवेत. सुंदर विभ्रम जाणणा–या त्या अप्सरा कोणाशीही एकनिष्ठ नसतात, तशीच ही राजलक्ष्मी! राजाने कितीही काळ राज्य केले तरी राजलक्ष्मी त्याच्याबरोबर स्वर्गात येणार नाही. हे सगळे ठाऊक असूनही मी तिच्यावर कसा विश्वास टाकू? ही सोन्याच्या भांड्यावर लिहिलेली आधीच्या राजांची नावे मला भयभीत करतात. हे सारे वैभव उसने आहे. ते जनतेच्या रक्ताने डागाळले आहे. ते पवित्र कधी होईल तर ते योग्य व्यक्तींच्या हाती जाईल तेव्हा.

 

आपले हे विचार अवन्तिवर्माने अशा ठिकाणी नोंदवले होते की रोज दिवसाची सुरवात त्या विचारांच्या दर्शनाने होई. म्हणूनच त्याने आपले सारे धन दान केले. छत्र–चामर सोडून बाकी सारे काही जनतेला देऊन टाकले. त्याच्या विचारांप्रमाणे पवित्र होऊन त्याने नव्याने स्वतःचे साम्राज्य उभे केले. सुय्यासारखा समर्थ मंत्री त्याला मिळाला. अवन्तिवर्मा जेव्हा गादीवर आला तेव्हा कश्मीरमधे महागाई गगनाला भिडली होती. तांदूळ २०० दिनारला विकले जात होते. सामान्यांना जगणं अशक्य होतं. त्याने तो भाव २००वरुन ३६ दिनारावर आणला यातच त्याचे कर्तृत्व लक्षात यावे. कश्मीरमधील पुराच्या समस्येचे त्याने कायमस्वरुपी निराकरण केले, त्यासाठी त्याने वितस्ता नदीचा अर्थात झेलमचा प्रवाह बदलला. ही सुय्याची योजना होती. हा सुय्य कोण? तर सुय्य एक शिक्षक होता. त्याच्यातले गुण ओळखून राजाने त्याला मंत्री केला. आजही अवन्तीपुर आणि सोपोर (अनेकदा जिथे दहशतवादी कारवाया झाल्याचे आपण वाचतो, ते मुळातील सुय्यपूर) या दोघांची स्मृती मिरवत आहेत. या सर्व प्रसंगांचा लेखाजोखा आपल्याला कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये नोंदविलेला पाहायला मिळतो. 

 

याच उत्पलवंशीय अवन्तिवर्माच्या दरबारातील आनंदवर्धनाबद्दल आणि कश्मीरच्या काव्यशास्त्रातील योगदानाबद्दल पुढील लेखात चर्चा करू.

 

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS.

Author: डॉ. समीरा गुजर -जोशी

June 16, 2022

समीरा ह्या संस्कृत साहित्याच्या अभ्यासक असून भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *