Vijñāna | विज्ञान

India has a rich scientific heritage preserved in our knowledge tradition. Insightful deliberations on subjects like Mathematics, Physics, Chemistry, Astronomy, Medicinal Science, Architectural Science and Linguistics among others are found in ancient Indian texts. Even the term Vijnana i.e. ‘Vishista Jnana’ which means specific knowledge was used to refer to manifold aspects of Indian scientific inquiry. Under Vijnana, this rich scientific heritage of India will be studied and deliberated upon.

प्राक्कालीन हिंदूंची गणितभरारी – १

सलिल सावरकर |  May 01, 2020  |  0 Comments | 3 Min.

सत्येतिहासावर आधारित कोणत्याही लेखास किंवा लेखमालेस हात घालताना त्यामागे लेखकाची भूमिका (किंवा त्याचे प्रयोजन) स्पष्ट असायला हवी आणि ती भूमिका तशी एकदा स्पष्ट झाली की मग त्यानंतर लेखनकाम करताना त्या भूमिकेस चिकटून राहण्याची चिकाटीही त्या लेखकाकडे हवी. इथे सत्येतिहास हा शब्द काहींना खटकू शकतो; कारण इतिहास म्हटला की (‘इति ह आस’ ह्या अर्थी) तो वास्तवात घडून गेलेल्या घटनांचाच मागोवा असला पाहिजे, त्यात असत्यास वाव आहेच कुठे? मग त्याच्या अलिकडे पुन्हा सत्य असा अधिकचा शब्द का जोडावा? पण गेली अनेक वर्षं खुद्द इतिहास विषयातही सत्यापेक्षा असत्याचाच जास्त भरणा होत असल्याची भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रस्तुत लेखमालेत इतिहासास जास्तीतजास्त धरून राहण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळेच द्विरुक्तीचा किंचित दोष पत्करूनही सत्येतिहास असा शब्द वापरलाय. असो! एकदा तुमची भूमिका तुमच्या मनात स्पष्ट झाली आणि तिला पकडून राहण्याची तुमच्या मनाची तयारी झाली की ती भूमिका (किंवा ते प्रयोजन) वाचकांस प्रथमत: समजवायला पाहिजे. ह्या पहिल्यावहिल्या लेखात लेखक स्वत:ची भूमिकाच वाचकांसमोर मांडायचा प्रयत्न करत आहे.

 

इतिहासाचा विचार करताना, ह्या भूमीत गेल्या काही शतकांत घडलेल्या सहस्रावधी पाशवी दुर्घटना, देशावर आलेले परचक्राचे संकट आणि त्याचा आम्ही केलेला सामना वगैरे बाबी सहजपणे आठवतात. ह्या संदर्भात सर्वप्रथम एक गोष्ट आपण निश्चित समजून घ्यायला पाहिजे, ती म्हणजे, परकीय आक्रमक जेव्हा तुमच्या भूमीत बळजबरीने किंवा जबरदस्तीने घुसतात तेव्हा त्यांच्या मनात कुठेही प्रतिष्ठापनेचा किंवा पुनरुत्थापनाचा मंगल हेतू नसतो. तुमची शिल्पं फोडून टाकणं, देवळे उध्वस्त करणं, उद्यानं उजाडून टाकणं आणि एकंदरीत सारा आसमंत भयकंपित करणं हा आणि हाच दुष्ट (किंवा स्पष्ट) हेतू त्यांच्या मनात असतो. कोणत्याही कारणास्तव इतिहासात डोकावून पाहताना, परकियांची आक्रमणे आणि आपली संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे त्यांचे प्रयत्न ह्याकडे दुर्लक्ष करणे ही आत्मवंचनाही आहे आणि अक्षम्य गुन्हाही! क्वचित ह्या आक्रमणांतूनही काही चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी तुमच्या वाट्याला येतातही, पण त्या निव्वळ योगायोगाने आलेल्या असतात. परकियांच्या मनात तुमच्याविषयी वाहत असलेल्या वात्सल्याच्या झऱ्यांमुळे नव्हे!

 

मात्र गेली कित्येक वर्षं आमच्या भूमीतील विशिष्ट विचारधारेच्या काही संशोधकांनी वेगळीच हाकाटी मांडली आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ह्या भूमीवर प्रस्थापित असलेल्या परकीय शाह्यांमुळे आमच्यावर जणू कृपेची बरसातच झाली असा उद्वेगजनक पवित्रा त्यांनी घेतला. थोडक्यात म्हणजे, इसवी सनाच्या सातव्या शतकापूर्वी आम्ही तसे मागासलेलेच होतो आणि हे परकीय शासक इथे पोहोचले नसते तर आम्ही आजही तसेच मागासलेलेच राहिलो असतो असा विचार कळत नकळत समाजाच्या सगळ्या थरांमध्ये पसरू लागला, किंबहुना ह्या तथाकथित विद्वानांनी तो पसरवला. ह्या सगळ्या विचारप्रवाहात सामान्य माणूस योग्य विचारांशी ठाम राहिला असता तरंच आश्चर्य! पण इतका खोलवर जाऊन विचार करणं सामान्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. नवल नाही की ह्या सगळ्या गलिच्छ विचारांच्या गटारगंगेत तो सहजच गटांगळ्या खाऊ लागला आणि मग आपल्याच इतिहासाकडे काहीश्या तुच्छतेने पाहू लागला. आपल्याच पूर्वजांना आणि त्यांच्या कर्तबगारीला तो कमी लेखू लागला. त्यांच्या निंदानालस्तीत त्याला कसलाही संकोच असा वाटेनासा झाला.

 

त्यातूनच मग, “आम्हा पामर हिंदूंना समस्त विद्या ख्रिश्चनांकडून तर सगळ्या कला मुस्लिमांकडून प्राप्त झाल्या, किमानपक्षी, आमच्या ओबडधोबड कला व विद्या ह्या दोघांनीच परिणत बनवल्या”, असा एक न्यूनगंड बहुसंख्य हिंदूंच्या मनात निर्माण होऊ लागला. बहुतेकांच्या विचारांचा लंबक हा असा विकाराप्रत पोहोचल्यावर त्याचीच नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून की काय, “सारं तथाकथित आधुनिक विज्ञान आमच्याकडे जणू सहस्रावधी वर्षांपूर्वीच ज्ञात होतं” असा आग्रही किंवा अभिनिवेशी सूर इतरेजनांकडून लावला गेला. खरंतर ह्या दोन्ही विचारधारा टोकाच्या असून सत्याशी बहुतांशी अपलाप करणाऱ्याच होत्या. ह्या सगळ्यातून सर्वसामान्य समाजमनाची मात्र एक जबरदस्त रस्सीखेचच सुरू झाली.

 

वेदकाळातील विमानप्रवासाचे, टेस्टट्यूब-जन्मांचे, संगणकादी विद्युत उपकरणांचे आणि परग्रहांवरील वास्तव्याचे केले जाणारे दावे, ठोस पुराव्यांच्या अभावी पोकळ ठरतात आणि त्यातूनच सामान्य हिंदूंचा न्यूनगंड अधिकच वाढत जातो. साहित्यात आढळून येणारे विमानांचे उल्लेख (रामायणातील पुष्पक), आकाशातून धरती कशी दिसेल ह्याचे यथार्थ वर्णन (कालिदासाचे मेघदूत), दूरवर घडणाऱ्या घटनांचे तपशीलवार वर्णन (महाभारतातील संजयाने युद्धाचे केलेले कथन) ह्या गोष्टी निश्चितच चिंतनीय असल्या तरी त्या ‘आमच्या भूतकालीन वैज्ञानिक प्रगतीचा ठोस पुरावा’ म्हणून दाखवता येत नाहीत. ह्यावर एक मधला मार्ग किंवा सुवर्णमध्य म्हणजे कोणतेही अवास्तव दावे टाळून, ज्याबद्दल आज नि:संशय पुरावे देता येतात तेवढ्याच गोष्टी लोकांसमोर मांडणं; आणि ह्या संदर्भात मूलभूत गणित हा एक उत्तम पर्याय ठरतो, कारण एकेकाळी सिद्ध केलेले सूर्यसिद्धांत, आर्यभटीय, सिद्धांतशिरोमणी, गणितकौमुदी असे काही (मोजकेच असले तरी उत्कृष्ट) ग्रंथ आज उपलब्ध आहेत.

 

पास्कलचा त्रिकोण, फिबोनॅची शृंखला, पायथॅगोरसचा त्रिकोण, पायथॅगोरसची त्रिकुटे, गणितीय श्रेढी (ऍरिथमेटिक आणि जॉमेट्रिक सिक्वेन्स), त्रिकोणमिती, परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा विचार, क्षेत्रफळे व घनफळे आणि त्यांची सूत्रे, कलनशास्त्राचा (कॅल्क्युलस) मूलभूत अंदाज अशा अनेक गणिती संकल्पना आपल्याकडे विस्ताराने चर्चिल्या गेल्या होत्या, आणि तेही शेकडो वर्षांपूर्वी, ही गोष्ट ह्या ग्रंथांमध्ये दिसून येते. तसेच शून्याशी परिचय, त्याचे चिन्हीकरण, दशमान पद्धत, ऋण संख्या व त्यांच्यावरील क्रिया आणि अनंताचा विचार ह्या सगळ्या गोष्टी तत्कालीन ग्रंथांच्या परिशीलनावरून सहज दृग्गोचर होतात. गणिताचा उपयोग करून आपण खगोलशास्त्रात जी प्रचंड कामगिरी केल्याचे दिसते ती तर थक्क करून सोडणारी आहे. पृथ्वीसकट अनेक ग्रह, तारे हे सपाट नसून गोलाकार आहेत ह्याचा निश्चित अंदाज आम्हाला होता. ह्यातील अनेक गोलांची त्रिज्या काढण्याचेही कौतुकास्पद प्रयत्न त्याचकाळी झालेले होते. तसेच हे सर्वच गोल अधांतरी आहेत हाही विचार त्या त्या ग्रंथांतून समोर येतो. थोडक्यात काय, तर गणित आणि खगोलशास्त्रातील आमची कामगिरी देदीप्यमान अशीच आहे; प्रेरकही आहे, उद्बोधकही आहे.

 

विशेष म्हणजे आर्यभट, भास्कराचार्य वगैरे आमच्या गणितज्ञांची अनेक पाश्चात्य गणित्यांनी केलेली स्तुती आज नेटवर आणि इतरत्र वाचण्यास मिळत आहे. अंकगणित, बीजगणित, भूमिती वगैरे क्षेत्रांत भारतीयांनी (खरं म्हणजे, हिंदूंनी) खूप मोठं योगदान दिल्याचं आज युरोपात आणि अमेरिकेतही मान्य केलं जात आहे. तेव्हा, आमच्या पूर्वजांच्या गणितभराऱ्या लोकांसमोर मांडण्याची ही योग्य वेळ आहे असे लेखकास वाटते. आपल्याच आजोबा-पणजोबांची ही बहुमोल कामगिरी पाहून समाज त्यातून काही प्रेरणा घेईल असा लेखकाला भरवसा वाटतो; आणि तेच आहे ह्या लेखमालेचे प्रयोजन, तीच आहे लेखकाची भूमिका!!

 

 

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry.

Author: सलिल सावरकर

May 01, 2020

सलिल सावरकर हे श्रीमती सी.एच.एम. महाविद्यालयाच्या गणित विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणितासह संगीत, संस्कृत, खगोलशास्त्र अश्या अनेक विषयांमध्ये त्यांना गती आहे .

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *