Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.
अक्षता जेस्ते | May 07, 2020 | 0 Comments | 3 Min.
भारत हा विविध कलांनी नटलेला देश आहे. ह्या सर्व कलांना एक प्रकारची परंपरा असल्याचे दिसते. अशीच परंपरा नृत्यकलेच्या बाबतीतही दिसून येते. भारतामध्ये नृत्यकला ही बरीच पूर्वीपासून अवगत असावी ह्याचे पुरावे प्राप्त होतात. अगदी हडप्पा-मोहेंजोदरोच्या काळातही ही कला अवगत असल्याचे निदर्शनास येते. याचे कारण की ह्या संस्कृतीतील सापडलेले नर्तकीचे शिल्प. ह्या शिल्पावरुन नक्कीच त्याकाळामध्ये नृत्यकला अस्तित्वात होती हे सिद्ध होते. तसेच दुसरा पुरावा म्हणजे भीमबेटका येथील लेण्यांमधील दगडामध्ये कोरलेली शिल्पे. हा पुरावा सर्वात प्राचीन मानला गेला आहे. भीमबेटका येथील लेण्यांमध्ये दगडावर काही शिकारी नृत्ये, धार्मिक विधींच्या प्रसंगी केली जाणारी नृत्ये तसेच काही लोकनृत्यांची शिल्पे कोरलेली आहेत. काळाचा विचार केल्यास भीमबेटक्यातील लेण्यांचा काळ हा हडप्पा-मोहेंजोदरोच्या काळाच्याही आधीचा मानला गेला आहे. ह्यावरुनच नृत्यकलेच्या प्राचीनतेबद्दल कल्पना येते. ह्या प्राचीन नृत्यकलेच्या प्रवासामध्ये काळानुसार बदल घडून सध्याच्या काळातील त्याचे विकसित रूप अस्तित्वात आहे.
नृत्य म्हणजे एखाद्या विशिष्ट आनंदाच्या किंवा उत्सवाच्या प्रसंगी शारीरिक हालचालीतून व्यक्त केला जाणारा आनंद, ज्याला आंगिक हालचालींसोबत संगीताची जोड असते. जगामध्ये अगदी प्राचीन काळापासून ते आताच्या काळापर्यंत जे काही प्रचलित नृत्यप्रकार आहेत, त्यापैकी भारतीय नृत्यप्रकार हे तुलनेने अधिक विकसित झालेले आहेत. याकारणास्तव भारतीय संस्कृतीमध्ये नृत्यकलेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नृत्यकलेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे भरतमुनी विरचित नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात नृत्याचा विचार केला आहे. इसवी सनाचे पहिले शतक साधारण ह्या ग्रंथाचा काळ मानला जातो. ह्या ग्रंथाचा मुख्य विषय हा नाट्य आहे. पण तरीही हयामध्ये नृत्य-संगीत ह्या कलांचा सुद्धा तितकाच विचार केलेला दिसून येतो. किंबहुना नाट्यशास्त्र ह्या ग्रंथामध्ये प्रथमतः नृत्याचा सखोल विचार केलेला दिसून येतो. नाट्यशास्त्रामध्ये नृत्याबद्दलचा विचार हा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे आजही नृत्याच्या अभ्यासासाठी हा महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
इतर नृत्य संस्कृतीच्या बाबतीत भारतीय संस्कृती ही अधिक पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध आहे. ह्या नृत्यकलेच्या विकासावर मधल्या काळामध्ये परकीय आक्रमणांमुळे परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. नृत्य परंपरा आणि मंदीरे ह्यांचा संबंध अत्यंत जवळचा आहे. भारतातील प्रचलित नृत्यप्रकारांपैकी बहुतांशी नृत्यप्रकारांची निर्मिती ही मंदीरे, आणि त्यामध्ये पूजेचा एक भाग यातून झाली आहे. परंतु ब्रिटीश राजवटीच्या काळामध्ये ह्या संस्कृतीला उतरती कळा लागल्याचे निदर्शनास येते. तरीसुद्धा प्रचलित नृत्यशैली ही मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे.
भारतात प्रत्येक प्रांतात विशेष नृत्यशैली उदयास आलेली दिसते. ह्या नृत्यप्रकारांतून त्या त्या प्रांताचे वैशिष्ट्य प्रतीत होते. ह्या नृत्यप्रकारामध्ये बहुतांशी लोकनृत्य संस्कृती अधिक प्रमाणात दिसून येते. ह्याचे उदाहरण सांगायचे झाल्यास पंजाब प्रदेशाचा भांगडा, महाराष्ट्राचे लावणी नृत्य, आसामचे बिहु नृत्य इत्यादी. ह्या लोकनृत्यांचे प्रकार आजही तेवढेच प्रसिदध आहेत आणि सादरसुद्धा केले जातात. याशिवाय आदिवासी जमातींचे नृत्य, शिकारी नृत्ये, गोंधळ इत्यादी नृत्यप्रकारसुद्धा प्रचलित आहेत. या नृत्यप्रकारांव्यतिरिक्त सात शास्त्रीय नृत्यशैली पण भारतात विकसित झाल्या आहेत, त्याम्हणजे भरतनाट्यम्, कुचीपुडी, मोहिनीअट्टम्, कथक, कथकली, मणिपुरी आणि ओडिसी. ह्यापैकी भरतनाट्यम्, कुचीपुडी, कथकली ह्या दाक्षिणात्य शैली आहेत. मोहिनीअट्टम् हा केरळचा, मणिपुरी अर्थात मणिपुर आणि ओडिसी ओरिसा प्रांताचा नृत्यप्रकार आहे. ह्या नृत्यप्रकारांचे सादरीकरण आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगात सादर केले जाते.
ह्या प्रत्येक नृत्यशैलीची स्वतंत्रपणे माहिती, त्याचे महत्त्व हे पुढील लेखांतून मांडले जाईल. प्रस्तुत लेखामध्ये नृत्य ह्या कलेचा थोडक्यात इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत प्राचीन काळापासून अस्तित्त्वात असलेली ही नृत्यकला सद्य परिस्थितीमध्ये भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक झालेली आहे.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS
May 07, 2020
अक्षता ह्या १८ वर्षांपासून भरतनाट्यम् शिकत आणि शिकवीत आहेत. तसेच डेक्कन महाविद्यालय येथे संस्कृत साहित्यातील छंद आणि ताल याविषयावर त्यांचे पी. एच. डी. प्रबंधाचे लिखाण सुरु आहे.