Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.
शरयू मयूर | May 29, 2022 | 0 Comments | 3 Min.
आपल्या मागच्या लेखात आपण ‘प्राचीन भारत’ ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. यात आपण प्रामुख्याने विविध साहित्यिक पुरावे अथवा संदर्भ यांचा विचार केला. पण कोणत्याही समाजाचा अथवा देशाचा इतिहास हा केवळ साहित्यिक पुराव्यांनी सिद्ध होऊ शकत नाही. कारण त्या पुराव्यांमध्ये अनेकदा त्या व्यक्तीच्या, लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब उमटलेले असते. त्यात कल्पनाविलासाचा भागही असू शकतो. त्यावर तत्कालीन समाजातील विविध मतप्रवाहांचा प्रभाव असतो. त्यामुळे अनेकदा शास्त्रीयदृष्ट्या वाङ्मय आधारासाठी वापरले जाते. ते इतिहासाचा मुख्य स्रोत मानले जात नाही.
केवळ ऐतिहासिक साहित्यावर आणि साहित्यातील ऐतिहासिक उल्लेखांवर अवलंबून भारताचा प्राचीन इतिहास पूर्णपणे लिहिता येणार नाही. या काळातील इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला ताम्रपट, शिलालेख, नाणी अथवा मुद्रा, ऐतिहासिक वास्तुशिल्पांचे अवशेष यांचा उपयोग करून घेता येतो. अभ्यासकांच्या सुदैवाने या प्रकारची साधने भारतात सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. याच बरोबर परकीयांची इतिवृत्तेसुद्धा महत्त्वाची ठरतात. यामुळे आपल्याला आपल्या प्राचीन समाज व्यवस्थेविषयी तटस्थ भूमिका व मते कळतात. अलेक्झांडरच्या स्वारीबरोबर निआर्कस व कर्टिअस हे दोन इतिहासकर आले होते. त्यांनी भारताविषयी नोंदी करून ठेवल्या आहेत. भारतात येऊन गेलेल्या चीनी प्रवाशांनी लिहिलेली तत्कालीन वर्णनेही महत्त्वाची समजली जातात.
आज आपण अशाच काही प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांची ओळख करून घेऊ या.
१) उत्कीर्ण लेख (ताम्रपट/शिलालेख):
उत्कीर्ण लेख हे अत्यंत विश्वासार्ह साधन समजले जाते. ते बहुदा ताम्रपटांवर लिहिलेले आढळतात. प्राचीन भारतीय इतिहासाची दृढ पायाभरणी करण्यात कोरीव लेखांचा वाटा खूप मोठा आहे. हे लेख मुख्यत्वे गुहांमध्ये, पुरातन मंदिरांच्या भिंतींवर, मूर्तीच्या आसनपट्टींवर, तलावाच्या काठावर अशा ठिकाणी आढळतात. हे लेख सरकारी (राज्यकारभाराशी निगडित) असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाने लिहिलेले, त्यात सुरुवातीला तत्कालीन राजवंशाची माहिती असते. राजांचे गुणवर्णन आणि पराक्रम यांची नोंदही अनेकदा आढळते. यामुळे तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. या लेखांत सामाजिक प्रश्न, जसे की मंदिरस्थापना, जीर्णोद्धार, तलाव, उद्यान, कुंड, वाचनालय यांची बांधणी यांचाही उल्लेख आढळतो. अभिषेक, दान आदी बाबींमुळे तत्कालीन धार्मिक परिस्थितीचे दर्शन घडते.
राजघराण्यातील थोर स्त्री-पुरुषांबरोबरच समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या जीवनाचे दर्शन या लेखांमधून होते. मावळातील कार्ले लेण्यात रोमन व्यापाऱ्याच्या दानाचेसुद्धा उल्ल्लेख आहेत. यामुळे समाजातील रूढींचा अभ्यास सोपा होतो. भारतातील कोरीव लेखांची सुरुवात सम्राट अशोकाच्या शिलालेखांपासून होते. हे लेख दक्षिणेत म्हैसूरजवळील ब्रह्मगिरी येथे, तसेच वायव्येकडे शहबाजगढी आणि मानसेहरा येथेही सापडतात. यावरून सम्राट अशोकाच्या विराट साम्राज्याचा अंदाज येतो. अशोकाचे बहुतांश लेख ब्राह्मीत आहेत; पण वायव्येकडे दोन लेख खरोष्टी लिपीमध्ये आढळतात. अशोकाचे लेख समाजाला सद्विचार आणि सद्वर्तनाकडे नेणारे आहेत.
या नंतरचे लेख सरकारी आणि खासगी अशा दोन्ही विभागात आहेत. पहिला प्रकार प्रशस्ती (पराक्रमाची स्तुती) आणि दुसरा प्रकार जमिनीच्या दानात मोडतो. सरकारी प्रशस्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अलाहबाद येथे असणारी अशोकस्तंभावर कोरलेली समुद्रगुप्तांची प्रशस्ती होय. तसेच चालुक्य पुलकेशी (दुसरा) याचीही ‘ऐहोळ प्रशस्ती’ प्रसिद्ध आहे. या लेखांमधून राजांच्या लढाया व विजय यांचे ठोस पुरावे मिळतात. ताम्रपटात मुख्यत्वे दाने, वतन व घराण्याविषयक महत्त्वाच्या नोंदी असतात.
कोरीव लेखांद्वारे सर्वांत जास्त प्रकाश तत्कालीन राजकीय जीवनावर पडतो. यामुळे कित्येक अज्ञात राजांची माहिती मिळते. उदाहरणार्थ रामगुप्त राजा होऊन गेला, हे फक्त विदिशाच्या लेखावरून सिद्ध झाले आहे.
२) नाणी :
भारताच्या सर्व भागांत विविध काळात होऊन गेलेल्या विविध राजवंशाची हजारो नाणी आजवर सापडली आहेत. नाणी हा सहसा दुय्यम ऐतिहासिक पुरावा मानला जातो; पण भारतात तो एक अस्सल पुरावा समजला जातो. कित्येक राजांची केवळ नाणी सापडल्याने, त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. अनेक राजवंशाच्या उतरत्या काळातील राजांनी आपल्या पूर्वीच्या नाण्यांवर पुन्हा शिक्के (रीपंचिंग) मारून स्वत:चे राजकीय सामार्थ्य अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. याच पुनर्मुद्रित नाण्यांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
पंजाब व सरहद्द प्रांतामध्ये राज्य करणाऱ्या ४२ इंडो-ग्रीक राजांपैकी ३९ राजे केवळ नाण्यांमुळे आपल्याला माहीत झाले आहेत. गुजरात व माळवा येथे राज्य करणारे हे त्यातलेच एक उदाहरण! नाणी तत्कालीन धार्मिक स्थितीवरही प्रकाश टाकतात. बुद्धांची मूर्ती दगडावर कोरण्यापूर्वी प्रथम एका नाण्यावर कोरली गेली. शिवमूर्तीची पूजाही लिंगपू जेच्या आधीपासून प्रचलित होती, हे नाण्यांवरून समजले. स्कंद, कार्तिकेय, विशाख आणि महासेन हे आज जरी आपण एक मानत असलो, तरी कुषाण काळात या चार वेगळ्या देवता होत्या आणि त्यांचे दर्शन कुषाण नाण्यांवर होते.
तसेच विविध राजांच्या नाण्यांवर तत्कालीन हिंदू, बौद्ध, ग्रीक आणि इराणी देवतांची चित्रे आढळतात. प्राचीन भारतात अनेक गणराज्ये आणि राजवंश नांदले, हे केवळ आणि केवळ नाण्यांच्या पुराव्यावरून समजते.
३) वास्तुशिल्पे:
प्राचीन वास्तू, उत्खननीय क्षेत्रे, मूर्ती, मंदिरे यांच्या अभ्यासामुळे ‘कलेचा आणि समाजाच्या विविध विकासाच्या टप्प्यांचा’ अभ्यास करता येतो. कलाविष्कार आणि समाजबांधणी विषयीच्या विविध संकल्पनांना मजबूती मिळते.
गेल्या शंभर वर्षात जी उत्खनने झाली, त्यातून प्राचीन शहरे उजेडात आली. हडप्पा, मोहेंजदरो, कालिबंगन आणि लोथल येथील शहरांच्या शोधामुळे व उत्खननांमुळे ‘प्राचीन सिंधू संस्कृती’ उजेडात आली. तिच्या समृद्धी आणि विकास यांचा अभ्यास करता आला. तसेच भारतभर पसरलेल्या सिंधू संस्कृतीच्या क्षेत्रामुळे तिची ग्रामीण आणि शहरी दोन्ही रूपे पाहता आली.
४) परकीयांची इतिवृत्ते :
प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाचे ठरणारे अजून एक साधन म्हणजे परकीयांनी भारताविषयी लिहिलेले वृत्तांत. अलेक्झांडरबरोबर आलेल्या इतिहासकारांनी अत्यंत मोलाचे लिखाण केलेले आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असलेल्या सेल्युकस निकेटरचा वकील मेगॅस्थनिस याने प्रत्यक्ष पाहून वर्णन केलेले आहे. त्याचा ‘इंडिका’ नावाचा ग्रंथ प्राचीन भारताविषयी अनेक गोष्टी स्पष्ट करतो. आज तो ग्रंथ नाही, पण त्यातील पुष्कळ माहिती त्यानंतर अनेक ग्रंथकारांनी उद्धृत केली आहे.
भारतात येऊन गेलेल्या चिनी प्रवाश्यांनी जी वर्णने लिहून ठेवली आहेत, ती अत्यंत महत्वाची मानली जातात. फा-हियान (इ. स. ५ वे शतक), इत्सिंग आणि युआन्श्वांग (इ. स. ७ वे शतक) यांचे लिखाण मूळ स्वरूपात सापडले आहे. ते भारतात पुष्कळ वर्ष राहिले, येथील भाषा शिकले. भारतात त्यांनी खूप प्रवास केला आणि याचमुळे त्याचे लिखाण अत्यंत विश्वसनीय मानले जाते.
या सर्व ऐतिहासिक साधनांमुळे आपल्याला तत्कालीन राजकीय प्रवाह, लोकांचे राहणीमान, मानसिकता आणि सांस्कृतिक मूल्य यांचे यथार्थ दर्शन होते. या साधनांमुळे आपल्या संस्कृतीवर आणि सांस्कृतिक मूल्य यांवर झालेले संस्कार आणि बदल दिसून येतात.
इतिहास म्हणजे त्या त्या काळातील लोकांनी आयुष्याच्या अभिवृद्धीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, संघटित काम आणि सहवेदनेची जाणीव यांचा वेध घेणे होय. याचा अभ्यास हाच इतिहासाचा अभ्यास आहे. इतिहास म्हणजे मानवाच्या वैश्विक विकासाची वाटचाल, जिचे स्वरूप एखाद्या नदीसारखे आहे. याचा वेध घेऊन भविष्याची वाटचाल सुकर करता येते. याचसाठी प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS.
May 29, 2022
शरयू या MIT School of Government मध्ये सहयोगी संशोधक म्हणून कार्यरत असून प्राच्यविद्या त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.