Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.
अक्षता जेस्ते | June 18, 2022 | 0 Comments | 3 Min.
भारतातील सप्त शास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी कथक ही लालित्यपूर्ण एक नृत्यशैली! बाकी नृत्यप्रकारांच्या तुलनेमध्ये कथक आणि भरतनाट्यम् ह्या दोन नृत्यशैलींचा प्रसार देशभरामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अधिक झाल्याचे निदर्शनास येते. कथक ही एक वैशिष्ट्यपूर्ण शैली मानली गेली आहे. ह्या शैलीचा उगम उत्तर भारतामध्ये झाला. काळाच्या दृष्टीने बघितल्यास साधारण इ.स.वी. सनाच्या ९ व्या-१० व्या शतकामध्ये ही शैली उदयास आली असे समजले जाते.
‘कथक’ हा शब्द संस्कृतमधील कथ् ह्या धातुपासून तयार होतो. ‘कथ्’ ह्या धातुचा अर्थ कथन करणे, सांगणे. पूर्वीच्या काळी दैवतांविषयीच्या कथा ह्या हातवारे करून साभिनय सांगण्याची पद्धत रूढ होती. ह्या परंपरेतूनच कथक ह्या नृत्यशैलीचा विकास झाला असल्याचे एक सांगितले जाते. ही परंपरा आणि महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेले कीर्तन हयामध्ये साम्य दर्शविता येते. अर्थात काळानुसार हयामध्ये अनेक बदल होत गेले. जरी ही नृत्यशैली कथन करण्याच्या परंपरेतून विकसित झाली असली तरीसुद्धा इतर शास्त्रीय नृत्यशैलींच्या तुलनेने कथकचे स्वरूप हे वेगळे जाणवते. ह्याचे कारण ह्या नृत्यशैलीवर मुघल साम्राज्याचा पडलेला प्रभाव! कथक नृत्यशैलीचा पुरावा म्हणून मुघल आणि राजस्थानी लघुचित्रे ह्यांचा संदर्भ दिला जातो. ह्या लघुचित्रांमध्ये ह्या नृत्यशैलीच्या जवळ जाणारी चित्रे सापडतात. काही मुघल लघुचित्रांमध्ये दरबारी नृत्याची चित्रे सापडतात. ही चित्रे कथक नृत्याशी साधर्म्य दर्शविणारी आहेत. ह्यावरुन कथक हा नृत्यप्रकार एकेकाळी दरबारामध्ये सादर केला जात असावा असा अंदाज बांधता येतो. ह्या गोष्टींमुळे कथक नृत्यशैली ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
कथक नृत्यशैलीचे वेगळेपण म्हणजे कथकच्या सादरीकरणामध्ये इतर नृत्यप्रकारांसारखे विशेष शारीरिक आकृतिबंध नसतात. हयामध्ये कलाकार सरळ रेषेमध्ये शरीर ठेऊन हालचाली करत असतात. गिरकी घेणे आणि उडी हे ह्या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य! तसेच गिरकी आणि उडी ह्यांबरोबर पदाघात (Foot Work) ह्यालाही अत्यंत महत्त्व दिले जाते. ह्या नृत्यसादरीकरणाची सुरुवात वंदना सादर करुन केली जाते. कथक नृत्याच्या सादरीकरणामध्ये तालाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. वंदना सादर करुन झाल्यानंतर ‘आमद’ ची रचना केली जाते. साधारण त्रितालामध्ये ह्याचे सादरीकरण होते. ह्यानंतर ‘थाट’ ही विशिष्ट अंग-उपांगाच्या हालचाली असलेली रचना सादर होते. ह्यानंतर ‘तोडा’, ‘तुकडा’, ‘परण’ इत्यादी रचनेतून एखादा ताल प्रदर्शित केला जातो. हा ताल प्रदर्शित करताना कलाकार विलंबित-मध्य-द्रुत तसेच दीडपट-तिप्पट लयीतसुद्धा तालाचे सादरीकरण करतात. कथक नृत्यशैलीत पदाघातातून ताल प्रदर्शित करण्यावर जास्त भर असल्याने त्यामानाने अभिनयचा भाग ह्या नृत्यामध्ये कमी प्रमाणामध्ये दिसून येतो. कथकमध्ये अभिनय ‘गत’ ह्या रचनेच्या सादरीकरणामध्ये येतो. गत ह्या रचनेमध्ये कृष्ण-राधा, गोपी ह्यांच्या आयुष्यातील छोटे छोटे प्रसंग जसे कृष्णाचा लोणी चोरून खाण्याचा, राधेचा ओढणी ओढून कृष्णाकडे चोरून पाहण्याचा इत्यादी प्रसंग सांगून ते तालाच्या ठेक्यावर सादर केले जातात. नृत्यसादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तराणा हा शुद्ध नर्तनाचा प्रकार सादर केला जातो. ह्या रचनेमध्ये विशेषतः पदन्यास सादर केला जातो. ह्या पदन्यासातून तालाच्या मूळ मात्रा दाखविल्या जातात. कथक सादरीकरणामध्ये पदन्यास हा क्लिष्ट समजला जातो. ह्यासाठी कलाकाराला जास्त सरावाची गरज असते. अशाप्रकारे कथक नृत्याचे सादरीकरण केले जाते. भजन, ठुमरी ह्या प्रकारांचे सुद्धा सादरीकरण कथकमध्ये विशेषत्वाने केले जाते.
कथक नृत्यशैलीमध्ये अर्थातच उत्तर भारतीय संगीताचा वापर केला जातो. हयामध्ये चर्मवाद्ये म्हणजेच तबला, पखवाज वापरले जातात. कथक सादरीकरणातील ‘तोडे-तुकडे’ ह्या रचना तबल्याच्या तर ‘परण’ ही रचना पखवाजच्या साहाय्याने सादर केली जाते. तसेच तबला आणि पखवाज ह्यांच्याबरोबर सारंगी आणि संवादिनी ह्या वाद्यांचीसुद्धा साथ असते. कथक नृत्यशैलीत ताल महत्त्वाचा असल्याने ही नृत्यशैली सादर करणाऱ्या कलाकाराचीसुद्धा तालावर व्यवस्थित पकड असणे अत्यंत गरजेचे असते. कारण ह्या नृत्यप्रकारातील रचना केवळ सादरीकरणापुरत्या मर्यादित नसून त्या आधी कलाकाराला त्या रचना म्हणून दाखवणे गरजेचे असते. ह्या सर्व गोष्टींमुळे कथक ही नृत्यशैली ही इतर नृत्यशैलींपेक्षा स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते.
प्रारंभीच्या काळामध्ये कथक ही फक्त एकल (solo) पद्धतीने सादर केले जात असे. पण पुढे काळानुसार त्यामध्ये बदल घडवून अनेक नर्तक-नर्तकींना एकत्र घेऊन नृत्यनाट्यांच्या रचना सादर केल्या जाऊ लागल्या. ह्या बदलामध्ये प्रसिद्ध कथक कलाकार पंडित बिरजू महाराज ह्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कथक नृत्यशैली ही उत्तर हिंदुस्थानी संगीतावर आधारलेली असल्याने त्याप्रमाणेच कथकमधील घराणीही दिसून येतात. हयामध्ये प्रामुख्याने लखनौ, जयपूर इत्यादी महत्त्वाची घराणी प्रसिद्ध आहेत. आजच्या काळामध्ये कथक नृत्यप्रकाराचे मोठ्या प्रमाणावर प्रयोग होतात. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही ह्या नृत्यशैलीचे सादरीकरण केले जाते. ह्यावरून ह्या शास्त्रीय नृत्यशैलीच्या प्रसिद्धीविषयी कल्पना येते. कथक नृत्यशैलीसाठी अच्छन महाराज, लच्छु महाराज, शंभू महाराज, गोपीकृष्ण, पंडित बिरजू महाराज, सितारा देवी, रोहिणी भाटे ह्यांचे योगदान मोलाचे आहे. तसेच सध्याच्या काळामध्ये कथक कलाकारांमध्ये शमाताई भाटे, राजेंद्र गंगाणी, कुमिदिनी लाखिया, शांभवी दांडेकर, शर्वरी जमेनीस हयांची नावे आघाडीने घेतली जातात.
काळानुसार अर्थातच नृत्यशैलीमध्ये बदल होत गेले. चित्रपट सृष्टीतही ह्या नृत्यशैलीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला दिसून येतो. यावरूनच कथक हा शास्त्रीय नृत्यप्रकार केवळ रंगमंचावर सादर करण्यापुरता मर्यादित न राहता रूपेरी पडदयावरसुद्धा ह्या नृत्यप्रकाराला महत्त्व देण्यात आले आहे. या सर्व कारणास्तव सप्त शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये उत्तर भारतातील नृत्यप्रकार कथक ह्याचे स्थान महत्त्वाचे ठरते.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS.
June 18, 2022
अक्षता ह्या १८ वर्षांपासून भरतनाट्यम् शिकत आणि शिकवीत आहेत. तसेच डेक्कन महाविद्यालय येथे संस्कृत साहित्यातील छंद आणि ताल याविषयावर त्यांचे पी. एच. डी. प्रबंधाचे लिखाण सुरु आहे.