Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.
सौ. नीलाताई रानडे, धुळे | July 01, 2021 | 0 Comments | 3 Min.
श्रीराम आणि लक्ष्मण वनात जाण्यासाठी कैकयी मातेने केलेला संकल्प हा आपल्या विषयाला पूरक असला तरी तो प्रसंगोचित होणार नाही. इतके मात्र सत्य की रामांच्या वनगमनामागे वसिष्ठांची एक मूक संमती होती. कैकयीचे कारस्थान हे रामासाठी होते हे मात्र मानायला पाहिजे. असे वाटते की रामांना वनातून परत अयोध्येत नेण्यासाठी भरत यशस्वी झाला नाही. पण चित्रकूट या ठिकाणी गंगापार करून भारद्वाजांच्या मदतीने कोणीही परत येऊ शकते असा अंदाज करून राम, लक्ष्मण आणि सीता यांनी चित्रकूट सोडले. या तिघांचा वनातील प्रवास कोणत्या दिशेने ह्वावा याची तजवीज वसिष्ठांनी आधीच केली होती. त्या मार्गावरील ऋषी मुनींना सांगून राम दक्षिणेकडेच जातील याची काळजी ठरल्याप्रमाणे ऋषीमुनींनी घेतली हे वाचकांनी समजून घ्यावे. चौदा वर्षांच्या कालावधीत रामांनी काय काय केले असावे असा प्रश्न अनेकांना पडतो. पण रामांचा हा वनवास त्यांना पुरुषोतमत्त्वाकडे घेऊन जाणारा होता. प्रभू या संबोधनाचा हा प्रवास होता असे वाटते.
आजपावेतो विश्वामित्रांच्या संस्कारांमुळे राम सजग होतेच. त्यांनी केलेल्या बोधप्रद कथनातून श्रीराम अधिकच स्वतःच्या ध्येयावर प्रेम करू लागले होते. राक्षसांचा उत्पात थांबवणे हे तर त्यांनी निश्चित केले होते. पण या राक्षसांना नरसंहारात प्रेरणा देणारा स्रोत कुठून येतो आहे त्याचा तपास आधी करावा असे त्यांना वाटले. मनाच्या वास्तव्यात श्रीरामांनी प्रथम जानकीला शस्त्रे कशी चालवावी हे शिकवले. दंड चालवूनही समोरच्या शत्रूला परास्त कसे करावे हे त्यांनी शिकवले. सीतेच्या या शिक्षणाचा उपयोग वनातील वास्तव्यात त्यांना फार उपयोगी पडला. चित्रकूटापासून निघून पंचवटीत येईपर्यंतचा तेरा वर्षांचा काळा मध्ये लागणाऱ्या छोट्या वस्त्या, गावे यातील लोकांना समजावण्यात आणि शिकवण्यात गेला. राक्षस भारतात सर्वत्र होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस त्यांनी स्वसंरक्षण शिकविले. त्या शिक्षणाची गरजही समजावून सांगितली. स्वत:वर आलेले संकट आपण कसे घालवू आपले रक्षण आपण कसे करू हे कळल्यावर अनेकांना आनंद झाला. अनेक हे शिक्षण घेऊन ते निर्धास्त झाले. आत्मनिर्भर झाले. सहाजिकच आपल्या काळजीपोटी आपल्याला शिकवणाऱ्या या मुनी वेशातल्या युवकाबद्दल अनेकांना आधार वाटू लागला. संरक्षणाची अत्यंत निकड होती. त्यामुळे या विषयावर श्रीरामांनी प्रचंड काम केले. ज्यावेळी मनात इतरांसाठी काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होते त्यावेळी त्याला योग्य अशी ऊर्जा ही निर्माण होते. आणि ही ऊर्जा सतत प्रज्वलित राहावी यासाठी रामाजवळ स्वयंनिग्रह होता. कुणी सांगितले म्हणून एखादे काम करणे वेगळे आणि स्वयंस्फूर्तीने आपल्या कर्तव्याचा तो एक भाग आहे असे मानून सक्रिय होणे वेगळे! राम या काळात अत्यंत सक्रिय होते. मनात येणाऱ्या नवनव्या संकटांचा मुकाबला करणं तर आवश्यक व क्रमप्राप्त होतं. पण कर्मालाच सर्वस्वी दोष न देता इतरांच्या संकटांच्या निवारणासाठीच मी इथे आलो आहे अशी मनाची समजूत घालून प्राप्त परिस्थितीवर त्यांनी मात केली.
तरीही रामांनी कोणत्याही संकटाला झुलवत ठेवले नाही. तिथल्या तिथे सोक्षमोक्ष लावून पुढची वाटचाल करण्याचा निर्णय त्यांना परत येणाऱ्या संकटांशी लढण्यास बळ देत होता आणि अशी अनिवार्य सावधानता बाळगून त्यातही काहीतरी वेगळे करण्याचे अवसान रामाकडे होते. हे अवसान म्हणजे लोककल्याणाचे विचार! हे अवसान म्हणजेच समाज स्नेह! या अवसनाचे दुसरे नाव प्रभू असावे! या शौर्यासाठी या धाडसासाठी आणि समोर आलेल्या समाजकार्यासाठी त्यांना वेगळा विचार करावाच लागला नाही. श्वास घेतल्यानंतर तात्काळ उच्छ्वास बाहेर पडतो. तितक्याच सहजतेने त्यांच्याकडून समाजसेवा झाली. त्यासाठी त्यांना ठरवून वेळ काढून वगैरे कार्य करावे लागले नाही.
वनवासातील एका क्षणी मनात येणारे विचार ते जानकीला सांगत. त्यावरून त्यांच्या समाजकार्याची भावना, त्याची तीव्रता, त्याची आवश्यकता समजते. वास्तविक अयोध्या सोडतानाच श्रीरामांना समजले होते वचनपूर्तीसाठी महाराजांना कैकयी मातेचे ऐकावे लागले. आपण वनात जावे असे महाराजांना वाटत नसून माता कैकयीला वाटते आहे. म्हणूनच तिने वर मागून तिच्या मनातील घटना सत्यात याव्या यासाठी वचनात बंदिस्त करून महाराजांकडून मला वनवास देवविला. आश्चर्य याचे वाटते की समोर राज्याभिषेकाची तयारी चालू असताना अयोध्या सोडावी लागली याचा किंचितही दुःख श्रीरामांना नाही. उलट माता कैकयीमुळे मला ही संधी मिळाली असे त्यांनी मानले. मातेचे उपकार शत शत कोटींचे आहेतअ, असे राम म्हणतात. त्यामुळेच मला ह्या वनातल्या लोकांच्या समस्या समजल्याचे ते कबूल करतात. स्वतःच्या आयुष्यात राजपुत्र असूनही चौदा वर्षे वनात जावे लागले याचे कणभरही दुःख रामांना नाही. राजवैभवात जे झाले नसते असे समाजासाठीचे काम मला इथे करता येते, यात ना कुणाचा अडथळा ना कुणाचा विरोध ना प्रतिष्ठेला शोभेल याची चिंता! उलट सीतेजवळ ते कबूल करतात. आयत्या सिंहासनावर बसून राजाची कर्तव्ये पार पाडायच्या ऐवजी इथेच राजा म्हणून करायची कर्तव्य पार पाडायला मला खूप आनंद होतोय. मनाच्या वैचारिक स्थितीमुळे राम मनापासून समाजकार्य करू शकली. त्यांना लक्ष्मण जानकीची खूप मदत झाली. रामांच्या सामाजिक कामांची इत्थंभूत माहिती देण्यापेक्षा काही मुद्दे सांगितले तर त्यांच्या समाजकार्याचा आढावा, त्या कामाची व्याप्ती व निकड आपल्या लक्षात येईल.
१) मद्य प्राशनाचा विरोध, त्यासाठी जनजागृती.
२) स्त्रीबद्दल प्रत्येक पुरुषाला आधार वाटावा म्हणून जनजागृती.
३) संस्कारांचे महत्त्व पटवून त्याचे फायदे सांगितले.
४) पूर्वीच्या ऋषी मुनींच्या राहणीमानाचे कौतुक करून त्याप्रमाणे राहण्याचा आग्रह.
५) सत्य-असत्याची दोन्ही पारडी सांगून कोणत पारडं जड आणि कसं हे समजावले. जे खाली पडते ते जड असते. पण सत्य हे खाली पडणारे नसून तेच माणसाला उंच नेते हेही सांगितले. आपला मान आपणच ठेवावा, स्वाभिमानाने चरितार्थ चालवावा.
६) आपल्या स्त्रीचे संरक्षण हे आपलेच कार्य असते.
७) परिवाराची काळजी घरातल्या कर्त्या पुरुषांनीच करावी.
८) चरितार्थ चालवितांना स्वतःची खरी गरज ओळखावी. चार पैशांसाठी सत्याकडे पाठ फिरवू नये.
९) आपल्याला शोभेल असे वर्तन करावे. १०) आपल्या कृतीशीलतेवर घरातील माणसांचे पोट भरणार आहे याची सतत जाणीव ठेवावी.
११) आपणास न रुचणारे कार्य कधी करू नये. किंवा त्यासाठी आपला इमान विकू नये.
१२) स्वाभिमानी माणूस हाच घराचा खरा संरक्षक असतो.
१३) आपल्या लोकांशी डोळा चुकवावा लागेल असे कृत्य करू नये.
१४) मनातील पवित्र भावच आपल्याला कार्य करायला भाग पाडतात. नेहमी मनाचे ऐका ऐकावे. इतरांच्या मनाचाही आधी विचार करावा.
१५) इतरांसाठी मन दयार्द्र ठेवावे. पण स्वतःसाठी ते नेहमी कठोर ठेवावे. तरच माणूस आजूबाजूच्या वातावरणातील मोहाचे क्षण आपण पार करू शकतो.
१७) स्वतःचा परिवार चालावा यासाठी अनीतीने वागणे चुकीचे आहे. नैतिकतेचे अधिष्ठान अतिशय महत्त्वाचे आहे. त्याने आंतरिक समाधान मिळते. या समाधानाच्या वाटपातून आनंद प्राप्त होतो. आनंदातून प्रेरणा जागृत होते. हीच प्रेरणा परत नवीन समाधान देण्यास तत्पर असते.
हे नुसते न सांगता रामांनी लोकांना पाठविले. मोह हा क्षणभराचा असतो. पण त्याचे परिणाम आयुष्यभर सोसावे लागतात. त्यामुळे मोहाच्या आहारी जाऊ नये. अशा अनेक विषयांवर श्रीरामांनी समाजाला सावधान केले. आचारातील शुद्धता समजाविली. समाजातील मानवता जिवंत राहावी आणि परस्परांना साहाय्य करीत जगावे यासाठी श्रीराम आजीवन आग्रही होते.
प्रस्तुत लेखमाला प्रामुख्याने वाल्मिकी रामायणावर आधारित आहे.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS.
July 01, 2021
सौ. नीलाताई रानडे ह्या वाल्मिकी रामायणाच्या अभ्यासक आहेत..