Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.
अक्षय विंचूरकर | July 07, 2022 | 0 Comments | 3 Min.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव विवादात येणे हे काही आजकाल त्यांच्या समर्थकासाठी अथवा विरोधकांसाठी नवीन नाही. वर्षभरातून अनेकदा असे प्रसंग येतात कि त्यावेळेस सावरकरांचे समर्थक माध्यमांमध्ये आपली बाजू मांडताना दिसतात आणि विरोधक मात्र वाट्टेल त्या थराला जाऊन टीका करण्याच्या तयारीत असतात. सावरकरांवर आज पर्यंत अनेकदा भरपूर आरोप केले गेले. गांधी हत्या, माफीनामा,इंग्रजांचे समर्थक,खोटा इतिहास लेखक,द्वि राष्ट्रवादी इ. पण हे सगळे आरोप धादांत खोटे आहेत ह्याची जाणीव आपल्याला पुरेश्या इतिहास संशोधनातून होते. परंतु,ह्या सर्व आरोपांव्यक्तिरिक्त एक असा आरोप वीर सावरकरांवर केला जातो तो म्हणजे “सावरकर हे मुसलमान स्त्रियांच्या बलात्काराच्या समर्थनार्थ बोलतात आणि त्यांनी हि गोष्ट आपल्या सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात नमूद केलेली आहे“. वीर सावरकरांच्या लेखनाचा वापर वामपंथीयांनी अगदी स्वतः च्या सोयीनुसार कायम करून घेतला आहे. त्यामुळे सदर लेखात त्यांना ‘सद्गुण विकृती‘ ह्या प्रकरणातून स्त्रियांबद्दल नक्की काय सूचित करायचे आहे ह्याचा आढावा घेतला आहे.
वीर सावरकरांचे लेखन मुळात आजकालच्या वाचकांसाठी नक्कीच सोपे नाही. त्यांची भाषा व त्यांचे धारदार लिखाण समजून हे घेण्यास नक्कीच वेळ लागतो. त्यांची पुस्तके सुद्धा वाचण्यासाठी एक क्रमवारी ठरवावी लागते – तेव्हाच त्यांना नक्की काय सूचित करायचे आहे हे आपणास कळून येते. वीर सावरकरांच्या लिखाणात त्यांचा संपन्न असा शब्दकोश आपल्याला वाचावयास मिळतो व आजकालच्या वाचकांना तो समजून घेण्यास थोडा वेळ लागतो. अनेक लोकांकडून मी ऐकले आहे कि “सावरकरांची भाषा कळत नाही म्हणून आम्ही त्यांना वाचत नाही“. ह्याच कारणामुळे अनेक विरोधक वीर सावरकरांना खूप सहजपणे अर्धवट किंवा त्यांना हवे तसे चित्रित करण्यात आणि सावरकरांबद्दल अनेक गैरसमज पसरवण्यात यशस्वी होतात.
वीर सावरकरांना अभ्यास करताना त्यांच्या लिखाणाचा विशेष अभ्यास करणे गरजेचे आहे आणि त्यात प्रामुख्याने त्यांच्या लिखाणाचा उद्देश समजून घेणे महत्वाचे आहे. त्यांचे कुठलेही लेख, पुस्तके अथवा त्यांची भाषणे ही फक्त प्रकाशनापूर्ती मर्यादित नव्हती तर त्यात आपल्या झोपलेल्या भारतीय समाजाला सत्य परिस्थितीशी अवगत करून जागे करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. त्यामुळे जाणकारांनी फक्त “सावरकरांना वाचा” अस म्हणण्यापेक्षा ते कसे वाचावे ह्याची सुद्धा जाणीव वाचकांना करून देणे गरजेचे आहे.
‘सहा सोनेरी पाने‘ ह्या ग्रंथातील ‘सद्गुण विकृती‘ ह्या प्रकरणात वीर सावरकर संख्याबळाचे महत्व स्पष्ट करताना सांगतात कि “पशूंच्या कळपातूनच हा सृष्टिक्रम माणसात उतरला. गाईंच्या कळपात वळूची संख्या जर गाईंपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक असेल तर त्या कळपांची संख्यावृद्धी झपाट्याने होणार नाही. पण ज्या कळपात गाईंची संख्या वळूच्या संख्येहून पुष्कळ प्रमाणात अधिक असेल तर त्या कळपाची संख्या झपाट्याने वाढत जाणार“. ह्या मुद्द्याकडे शास्त्रीय दृष्ट्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर असे दिसून येते कि मनुष्याला सुद्धा हाच नियम लागू होतो. हा मुद्दा पटवून देण्यासाठी वीर सावरकर नागा लोकांचे आणि अफ्रिकेतील काही रानवट टोळ्यांचे सुद्धा उदाहरण देतात आणि कश्या प्रकारे शत्रुपक्षातील स्त्रियांना ते युद्ध हरल्यावर आपल्या समाजात घेत किंवा स्त्री योद्ध्यांना चालू युद्धात कसे आधी मृत्युमुखी पाडता येईल ह्यावर भर देत जेणेकरून आपले संख्याबळ वाढेल अथवा त्यांचे घटेल. थोडा अजून खोलात जाऊन विचार केला असता आपल्या हे निदर्शनास येईल कि मुस्लिम आक्रमणकारी सुद्धा हिंदूं स्त्रियांना ह्याच सिद्धांतानुसार स्वतःचे संख्याबळ वाढवण्यासाठीच त्यांचे धर्मांतरं करीत. थोडक्यात मुसलमान आक्रमणकाऱ्यांची हि वृत्ती हिंदूंचे संख्याबळ नामशेष करण्या इतकी घातक होती. वीर सावरकरांना हिंदूंवर आणि हिंदू स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराचा राग नक्कीच होता परंतु ते काही ठिकाणी असा प्रश्न सुद्धा करताना दिसतात कि भारताने इस्लामिक राष्ट्रांच काय बिघडवलं होत कि त्यांनी ह्या भारतावर आक्रमणे करून इथे उच्छाद मांडावा ? ह्या प्रश्नाचा प्रामाणिक शोध घेतला असता आपल्याला दिसून येईल कि भारतावर झालेल्या मुसलमानांच्या पहिल्या स्वारीच्या आधी त्या राष्ट्रांना कुठल्याही प्रकारचा त्रास कधीच दिला नव्हता आणि म्हणूनच हि गोष्ट कुठल्याही विचारवंतांना व्यथित करणारीच होती.
तसेच ह्या ग्रंथात अनेक ठिकाणी ‘हिंदू स्त्रियांना बाटवण्याचे उल्लेख येतात. तर बाटणे अथवा बाटवणे ह्या शब्दातून सावरकरांना नक्की काय सूचित करायचे होते ? बाटणे ह्या शब्दाचा अर्थ एखाद्या स्त्रीचे अथवा पुरुषाचे धर्म परिवर्तन करणे असा होतो. त्याचा अर्थ मुळीच एखाद्या स्त्री ची अब्रू लुटणे असा होत नाही. जेव्हा जेव्हा भारतावर इस्लाम चे आक्रमण झाले तेव्हा तेव्हा त्यांनी इथल्या मंदिरांची आणि संस्कृतीची नासधूस तर केलीच पण त्याच बरोबर इथल्या हिंदू स्त्रियांची अब्रू सुद्धा लुटली. त्यांना बळाने मुसलमान करण्यात आले आणि त्यांच्या पोटी जी संतती जन्म घेई ती कट्टर मुसलमान म्हणूनच वाढे. त्या काळी अनेक हिंदू राजघराण्यातील स्त्रियांनी जोहार का केले ? त्याचे कारण एकमात्र हेच होते कि युद्धात हिंदू राजाचा पराभव झाल्यावर त्या स्त्रियांना बळाने बाटवण्यात येई (धर्मांतरित). ह्याच कारणाने इतिहासात आपल्याला असे अनेक दाखले आढळतात कि त्या त्या वेळेस हजारो हिंदू स्त्रियांनी मुसलमान राजांच्या हाती स्वतःला सुपूर्त न करता आपल्या मुलाबाळांना घेऊन अग्निकुंडात स्वतःला भस्म करून घेणे पसंत केले. म्हणून वीर सावरकर म्हणतात कि जेव्हा जेव्हा हिंदूचा युद्धात विजय झाला त्या त्या वेळेस त्यांनी त्या मुसलमान घराण्याच्या स्त्रियांना सन्मान पूर्वक हिंदू धर्म अंगिकारण्यासाठी सांगावयास हवे होते आणि त्यांच्याशी रीतसर लग्ने लावून त्यांना आपल्या समाजात मानाचे स्थान द्यायला हवे होते.
वीर सावरकरांवर आणि त्यांच्या लिखाणावर प्रक्षोभक पणा चा आरोप सुद्धा होतो. त्यांचे लिखाण हे धारदार नक्कीच होते पण प्रक्षोभक नव्हते आणि ते सत्या वर आधारलेले होते. ह्याचे कारण असे कि त्या वेळेस ची परिस्थिती पाहता आपल्या समाजाने जागरूक व्हावे हीच त्यांची मनीषा होती. म्हणून त्यांनी ‘सहा सोनेरी पाने‘ ह्या ग्रंथाची रचना करून आपल्या देशाचा खरा इतिहास आपल्या लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला जेणे करून त्यांच्या मनातून गुलामीची भावना नष्ट व्हावी आणि आपल्या अंगात सुद्धा शूरांच आणि पराक्रमाच रक्त आहे ह्याची जाणीव त्यांना व्हावी. आज च्या घडीला आपण तेव्हाचा विचार केला असता त्या काळची परिस्थिती अत्यंत भिन्न होती ज्याचे चित्रण कदाचित आपण आपल्या मनात कधीच उभे करू शकणार नाहीत.
वीर सावरकरांचे कार्य, त्यांचे लिखाण हे निश्चितच महान आहे. परंतु विरोधक अनेकदा ह्या विषयावरून सावरकरांच्या सर्व विचारांवर प्रश्न चिन्ह निर्मांण करताना दिसतात जे अत्यंत चुकीचे आहे. नक्कीच हा मुद्दा संवेदनशील आहे. त्यावर विरोधकांनी अभ्यास पूर्वक चर्चा करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु ह्या मुद्द्यावरून सावरकर हे स्त्रीद्वेषी होते अथवा ते बलात्कार सारख्या घृणास्पद गोष्टीच्या समर्थनार्थ बोलायचे हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. हि सर्व चर्चा करत असताना एक गोष्ट नक्कीच ह्या ठिकाणी मान्य करावी लागेल ती म्हणजे वीर सावरकरांचे वरील विचार आजच्या घडीला पचवणे कठीण जाऊ शकते परंतु त्या मागची त्यांची भूमिका कळण्यासाठी त्यांच्या लिखाणातले कुठलेही प्रकरण किंवा वाक्य मधूनच उचलून वाचले तर ते चालणारे नाही. सावरकरांनी त्यांच्या लिखाणात अनेक पराक्रमी स्त्रियांचे पराक्रमाचे कथन केल्याचे आपणास दिसून येते. एवढेच नाही तर त्यांनी वेळोवेळी हिंदूंच्या चुकीच्या आणि भंपक रुढींवर सुद्धा कठोर टीका केलेली आहे आणि ह्याचे अनेक दाखले आपल्याला सद्गुण विकृती ह्या प्रकरणात सुद्धा दिसतात. तसेच ह्या संपूर्ण ग्रंथात सुद्धा त्यांनी वारंवार ह्यांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. म्हणून,कुठल्याही विरोधाला बळी पडण्या आधी वीर सावरकरांचे विचार समजून घेणे किंवा तसा प्रयत्न तरी करणे हिताचे ठरेल.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS.