Saṁbhāṣā | संभाषा

Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.

लोकमान्यांच्या पत्रकारितेचा वसा आणि आजची पत्रकारिता

लक्ष्मीकांत जोशी |  July 29, 2021  |  0 Comments | 3 Min.

‘लोकमान्यांची पत्रकारिता’ या शब्दातच पत्रकारितेच्या इतिहासातील एका मानदंडाचे दर्शन घडते. हे वर्ष लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. १९२० ला टिळकांचे निधन झाले. त्यावेळी ‘टिळक युग’ संपले अशीच इतिहासानेही नोंद केली. भारतीय राजकारणाच्या स्वातंत्र्यपूर्वकालीन घटनाक्रमावर नजर टाकली तर टिळक हे एकमेव राजकीय नेते ठरतात की ज्यांचा कार्यकाल त्यांच्या नावाने ‘टिळक युग’ या नावाने नोंदविला गेला; ओळखला गेला किंबहुना मान्यताही पावला. लोकमान्यांची गुणसंपदा किती विविधांगी होती हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. परंतु वेद, उपनिषदे यांपासून ते तत्कालीन आधुनिक सामाजिक परिस्थितीची खडान् खडा माहिती असलेली, तत्संबंधी वाचनाचा तितकाच व्यासंग असलेली लोकमान्य ही एकमेव व्यक्ती ठरते. आपल्याकडे असलेली विद्वत्ता आणि नियतीने आपल्यावर सोपवलेले राजकीय नेतृत्व याचा योग्य तो मेळ साधण्याचा योगायोग त्यांच्या पत्रकारितेत दिसून येतो. शिक्षण संस्थेचा पसारा मांडला असताना त्यातूनच वृत्तपत्र काढण्याची कल्पना सुचली आणि केसरी, मराठा या वृत्तपत्रांचा जन्म झाला. त्यांच्या केवळ पत्रकारिता या गुणवैशिष्टय़ाचा विचार करायचा म्हटले तरीसुद्धा तो खूप पृथक्पणाने करता येत नाही. म्हणूनच आजच्या पत्रकारितेशी त्याची तुलनाही होऊ शकत नाही आणि तोच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आजच्या पत्रकारितेने लोकमान्यांचा वारसा सांगण्याचा हक्क खरे तर गमावलेला आहे, याची तीनच प्रमुख कारणं सांगता येतात. एक म्हणजे लोकमान्यांचा पत्रकारितेमागचा उद्देश, त्यांच्याकडे असलेली विद्वत्ता आणि सर्वसामान्य वाचकांसाठी केसरी, मराठा यांची निर्मिती या तीनही गुणवैशिष्टयांमध्ये आजची पत्रकारिता मोजता येत नाही किंवा लोकमान्यांनी निर्माण केलेले मानदंड आज लागूही पडत नाहीत.

 

स्वराज्यप्राप्ती आणि त्याकरिता लोकांचे प्रबोधन हा त्यांच्या पत्रकारितेचा मूळ उद्देश होता. मात्र हे करीत असताना समाजातल्या अनेक घडामोडींवरची त्यांची भाष्येसुद्धा विलक्षण परिणाम करणारी ठरत असत. पुण्यातीलच काय परंतु राज्यातील अनेक सामाजिक घटनांवर केसरीतून केले जाणारे भाषण हे अधिक वस्तुनिष्ठ आणि लोकांचा संभ्रम दूर करणारे राहिले. याबाबतची अनेक उदाहरणे देता येतील. परंतु त्यातले वाद हे तत्त्वबोध करणारे असत हे लक्षात घेतले पाहिजे. टिळकांची पत्रकारिता ही अधिक तत्त्वाधिष्ठित होती हे आजच्या पत्रकारितेशी तुलना करताना स्पष्ट होते. १८९७ चा त्यांचा कारावास संपल्यानंतर कोणीतरी त्यांना सुचवले की तुम्ही आता केसरीवर तुमचे नाव घालू नका. त्यावेळी टिळकांनी उत्तर दिले होते की अहो, हे सतीचे वाण आहे ज्याचे त्यानेच पत्करले पाहिजे. याचा अर्थ पत्रकारितेकडे बघण्याची त्यांची दृष्टी कोणत्या प्रकारचे पावित्र्य ठेवून होती हे लक्षात येते. केवळ इंग्रज सरकारवर टीका किंवा जनहितविरोधी धोरणांवर हल्ला करण्याची संधी त्यांनी आपल्या अग्रलेखांमधून सोडली नाही. तर त्याचवेळी उपयुक्त सूचना करून लोकांचे समर्थन मिळवण्याचे कौशल्य लोकमान्यांनी संपादित केले होते. केसरी चालवत असतानाच देशातल्या अन्य वृत्तपत्रांकडेही त्यांची नजर असायची. केसरीतले लेख, अग्रलेख हे लोकांना पचनी पडायला हवेत किंबहुना केसरी वृत्तपत्र केवळ व्यवसाय म्हणून सुरु झालेले नाही याविषयी लोकांच्या मनात आदर निर्माण झाला पाहिजे, याचा त्यांनी आदर्श ठेवला होता. टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका सांगताना एके ठिकाणी एक लेखक म्हणतो की अन्य प्रांतांमध्ये हिंदू, स्टँडर्ड किंवा कानडी भाषेत स्वदेश मित्रम्, बंगाल्यांमध्ये बंगवासी, हितवादी या पत्रांचा खप मोठा असल्याचे कोणीतरी त्यांना सांगितले. त्याचा समाचार घेताना लोकमान्य म्हणाले की ही पत्रके मजकूराच्या जोमावर चालत नसून बक्षिसे वगैरेंच्या लालुचीने चालतात. ती लालूच म्हणजे एक प्रकारचा जुगार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासंदर्भात आजच्या पत्रकारितेचा विचार केला तर कोणाचेही स्पष्ट उद्दिष्ट किंवा धोरण दिसत नाही. ते नसल्यामुळेच खप टिकवण्याकरीता वेगवेगळ्या प्रकारचे गँब्लिंगच करावे लागते.

 

लोकमान्यांची पत्रकारिता ही प्रामुख्याने त्यांच्या अग्रलेखांसाठी ओळखली गेली आणि तसा ठसा त्यांनी उमटवला. किंबहुना त्यांचे अग्रलेख आणि भाषणे पाहूनच चिरोल साहेबाने त्यांना ‘फादर ऑफ अनरेस्ट’ म्हणजेच ‘असंतोषाचे जनक’ असे म्हटले होते. परकीय सत्तेविरुद्धचा असंतोष निर्माण करताना केसरी या वृत्तपत्राने अनेक नवे शब्द, नवी भाषा अस्तित्वात आणली. त्यांच्या अग्रलेखाचे मथळे म्हणजे अशाच नव्या भाषेचीच चपखल उदाहरणे ठरतात. माँटेग्यू सुधारणांच्या वेळी त्यांनी अग्रलेख लिहीला आणि त्याला ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे’ असा मथळा दिला होता. त्यासंदर्भातली लोकमान्यांची आणि केसरीची भूमिका इंग्रजी वृत्तपत्रांना त्याचदिवशी कळवायची होती. म्हणून त्याला इंग्रजीमध्ये योग्य मथळा सुचवण्याचा अनेकजण प्रयत्न करू लागले. मग ‘मॉर्निंग विदाऊट सन’ अशा प्रकारच्या भाषांतराचा प्रयत्न झाला. परंतु लोकमान्यांनी लागलीच ‘सनलेस मॉर्निंग’ असा मथळा सुचविला. यावरून त्या विषयाशी ते किती एकरूप झाले होते हे स्पष्ट होते. आपल्या वृत्तपत्रातील भाषा कशी असावी यावरही त्यांचा कटाक्ष होता. “केसरी सुरू केला तेव्हा आम्हाला नवीन भाषा बनवावी लागली. जुन्या मराठीत भक्ती आणि वेदांत होता. शाहिर आणि गोंधळी लोकांनी त्यात वीररसाची भर घातली. पण राजकारणाची गंभीर चर्चा, वादविवाद, उपहास, थट्टामस्करी या सर्व गोष्टी करण्याकरीता आम्हाला भाषाच निर्माण करावी लागली. ज्या मनुष्यात उत्कटता आहे तो सहज भाषा निर्माण करू शकतो.” थोडक्यात सांगायचे तर ज्या उद्दिष्टांसाठी आणि ज्या वातावरणात त्यांनी हे सतीचे वाण स्वीकारले होते त्यासाठी सर्व वाचकांना उपयुक्त ठरेल अशी सहज भाषा हेदेखील केसरीचे वैशिष्टय ठरले होते. म्हणूनच त्यांच्या अग्रलेखाचे मथळे विशेष गाजणारे ठरत असत. म्हणजेच आपल्या उद्दिष्टांसाठी सामान्यांचा सहभाग प्राप्त करणारी सहज भाषा अशा अनेक अर्थाने लोकमान्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतःचा एक मानदंड निर्माण केला. जो आजच्या पत्रकारितेत कुठेच पाहायला मिळत नाही. मिळू शकणारही नाही. कारण मूळ उद्दिष्टांमध्येच फरक पडलेला आहे.

 

त्यांच्या संदर्भातल्या आठवणींमध्ये असाही उल्लेख वाचायला मिळतो की ‘वर्तमान पत्रकार’ होण्यासाठी माणसाने काय काय वाचले पाहिजे, काय तयारी केली पाहिजे या प्रश्नांच्या उत्तरात लोकमान्य म्हणतात की कवीसंबंधाने अथवा शिक्षकसंबंधाने असे म्हटले जाते ‘He is born not made.’ त्याचप्रमाणे वर्तमान पत्रकारांच्या संबंधानेही आहे. गुण हा उपजत असावा लागतो. रोज काही नवीन नवीन लिहावयाचे नसते. एकच गोष्ट रोज निरनिराळ्या रूपाने मांडायची असते इतकेच. काल आपण काय लिहीले आहे, ते आज लोक पाहत बसत नाहीत. मात्र लोकांना सांगण्यासाठी तुमच्याजवळ काही दिव्य संदेश असला पाहिजे आणि तुम्हाला असे वाटले पाहिजे की ही गोष्ट लोकांना मी जर पटवून नाही दिली तर देशाचा घात होईल. असे जेव्हा वाटू लागते तेव्हाच ‘वर्तमान पत्रकार’ व्हावे. बाकीची तयारी हळुहळू आपोआप होईल. ज्या प्रसंगी ज्या विषयावर लिहावयाचे असेल त्या प्रसंगी त्या त्या विषयांचे संपूर्ण अध्ययन करून मग लिहिण्याचा सराव ठेवावा. म्हणजे आपल्या लेखाचे तेज पडते. एकदा लिहीलेले परत लिहीण्याचा प्रसंग येत नाही. नरसोपंत (न. चि. केळकर) असेच तयार झाले आहेत. संमतीवयाच्या बिलाची चर्चा चालत असताना सारे स्मृतिशास्र मी वाचून काढले होते. लोकमान्यांचा हा सल्ला आजच्या पत्रकारितेला पुरेसा समज देणारा ठरू शकतो. तिथेच पत्रकारितेसाठी आवश्यक असलेल्या विद्वत्तेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ज्या तेजाचा उल्लेख लोकमान्यांनी केला तसे कोणत्या प्रकारचे तेज आजच्या पत्रकारितेत आहे हे शोधूनही सापडत नाही. वर्तमानपत्रातल्या लेखाच्या मथळ्याला त्यांनी एकदा स्त्रियांच्या नथीची उपमा दिली होती. नथीमुळे मुळच्या सौंदर्यात तर भर पडतेच; पण मुळीच सौंदर्य नसले तरी ती उणीव काहीअंशी भरून येते. याचा अर्थ लेखाकडे वाचक आकृष्ट होईल आणि आपला उद्देश साधला जाईल असाच त्यांचा त्यामागचा हेतू दिसून येतो.

 

आजच्या पत्रकारितेपुढे नेमकी उद्दिष्टे काय आहेत याचादेखील पत्ता लागत नाही. खप टिकवून ठेवण्याकरीता लोकमान्यांनी वापरलेला गँब्लिंग हा शब्दच योग्य वाटतो. तत्त्व, पत्रकारितेचा उद्देश आणि वाचकांबरोबरचे नाते या निकषांमध्येसुद्धा केसरीचे वेगळे वैशिष्टय होते. तोटा सहन करून आणि वाचकांची क्रयशक्ती लक्षात घेऊन केसरीच्या किंमतवाढीला त्यांनी केलेला विरोध हा जितका महत्त्वपूर्ण ठरतो; तितकेच राजकारणात त्यांनी वापरलेले ‘रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन’सुद्धा! ब्रिटिशांकडून ज्या गोष्टी पदरात पाडून घेता येतील त्या पाडून घ्यायच्या आणि पुन्हा नव्या मागण्यांसाठी सिद्ध राहायचे; हे तत्त्वही त्यांनी पत्रकारितेत वापरले. वाचकांची जेवढी लोकप्रियता संपादित करता येईल ती संपादन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि उत्तरोत्तर केसरीचा प्रभाव वाढवत ठेवला. या मुद्द्यांचा विचार केला तर ज्या लोकमान्यांनी आपल्या संपूर्ण कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यात पत्रकारिता क्षेत्रातसुद्धा मानदंड निर्माण केला गेला. म्हणूनच त्याची इतिहासाला ‘टिळक युग’ म्हणूनच नोंद करावी लागली.

 

 

Views expressed are of thr author’s and do not necessarily represnt the official position of Mimamsa- An Indic Inquiry. 

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *