Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.
शरयू मयूर | July 10, 2022 | 0 Comments | 3 Min.
आज एखादी गोष्ट लिहिणे किंवा ‘लिखाण’ हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या हातून होणारी ती एक सहज कृती आहे. शाळेच्या प्रश्न-उत्तरांपासून ते कॅलेण्डरवरच्या दुधाच्या हिशेबापर्यंत आपण काही ना काही तरी लिहीतच असतो. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जरी आपण ‘टायपिंग’ (टंकलेखन) करत असलो तरीही समोरच्या कॉम्प्युटरवर, मोबाइलवर लिहिलेच जाते. आजची समाजमाध्यमे तर विविध विषयांवरील लिखाणाने ओसंडून वाहत आहेत.
पण आज आपल्यासाठी लिहिणे जितके सोपे व सहज आहे, ते तसे मानवी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर होतेच असे नाही. मानववंशशास्त्रानुसार मानवाला भिंतीवर किंवा जमिनीवर खरवडून आकार किंवा रेषा काढण्याच्या अवस्थेत यायला खूप वेळ लागला. याची दोन प्रमुख कारणे मानली जातात. एक म्हणजे तसे करण्यासाठी लागणारी मनाची, विचाराची संगती, त्यासाठी लागणारी मेंदूची वाढ. दुसरे म्हणजे असा आकार काढण्यासाठी होणारी हाताची हालचाल; ज्यात अंगठा हाताच्या उरलेल्या बोटांपासून लांब असण्याची व वेगळ्या पद्धतीने हालचाल करू शकण्याची गरज असते. त्यामुळे अश्मयुगीन कालखंडातील उत्खनन क्षेत्रात जिथे भित्तिचित्रे, विविध आकार-रेघोट्या व गुंफाचित्रे सापडली आहेत असा मानव बराच उत्क्रांत झालेला होता, असे मानले जाते.
या सर्वात लेखन तेही अर्थपूर्ण हा विषय खूप पुढचा होतो. कारण यासाठी लिपींची निर्मिती, भाषांचा विकास आणि प्रसार या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. एखाद्या विशिष्ट स्वराला विशिष्ट आकार देणे आणि तो तसाच सर्वत्र वापरणे, हे काम अतिशय अवघड आहे.
यातूनच मग प्राचीन भारतीयांना लिहिता येत होते का, प्राचीन भारतामध्ये लेखनकला अस्तित्वात होती का हे प्रश्न सुरू होतात. याविषयी मतमतांतरे असल्यामुळे हा प्रश्न विवाद्य आहे. या विवादाचे मुख्य कारण म्हणजे भारतातील मौखिक परंपरा. अगदी मागच्या शतकापर्यंत भारतात याच परंपरेप्रमाणे विद्याभास होत असे.
अनेक भारतीय अभ्यासकांच्या मते भारतात लेखनकला होती व तिचा वापर दैनंदिन जीवनात होत असे. त्यांच्या मतानुसार भारतातील सर्वात प्राचीन लिपीचे नाव ‘ब्राह्मी’. या लिपीत प्रत्येक अक्षरचिन्ह एकच ध्वनी सूचित करते. पारंपरिक मतानुसार अशी निर्दोष लिपी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने निर्माण केली.
पाकिस्तानात प्रथम सापडलेल्या आणि नंतर भारतभर सापडलेल्या विविध उत्खनन क्षेत्रांमुळे सिंधू संस्कृती सर्वांना परिचयाची आहे. या संस्कृतीच्या विविध क्षेत्रात शेकडो मुद्रा सापडल्या आहेत. या मुद्रांवर पशु-पक्षी, मानवाकृती यासोबत रेखालिपी व काही चिन्हे सापडली आहेत. या रेखालिपीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न विविध अभ्यासकांनी केला. हंटर, प्राणनाथ, हेरास अशा भारतीय आणि परदेशी अभ्यासकांनी याचा पाठपुरावा करण्यात वर्षे घालवली. परंतु, या लिपीचे योग्य आणि समाधानकारक वाचन अजूनही झालेले नाही. त्यानंतरच्या काळातील ब्राम्ही आणि खरोष्ठी लिपीचे वाचन द्वैभाषिक नाण्यांमुळे शक्य झाले. पण सिंधू लिपीच्या समकालीन ज्ञात लिपी अद्याप सापडली नसल्याने तिचे वाचन होऊ शकले नाही.
लेखनकलेचा/ लेखनविद्येचा निर्माता साक्षात् ब्रह्मदेव आहे, अशी संपूर्ण भारतभर समजूत आहे. या कल्पनेविषयी उल्लेख आपल्या जैनांच्या ‘पन्नावणासूत्रा’त (इ.स.पू १६८) आणि ‘समवायांगसूत्रा’त (इ.स.पू ३००) सापडतात. तसेच या कल्पनेचा आधार नारदस्मृती आणि मनुस्मृतीच्या बृहस्पतीच्या वार्तिकात घेतला आहे.
नंतरच्या काळात याच कल्पनेचा पाठपुरावा चिनी प्रवासी युआन्श्वांग याने केला. बौद्धधर्माच्या प्रसाराच्या निमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीत अनेक संस्कृत बौद्ध ग्रंथांचे चिनीभाषेमध्ये अनुवाद झाले. त्यातील फॅ-वॅन-शु-लिन या चिनी ग्रंथात ब्राह्मी लिपीची उत्पत्ती सांगितलेली असून, तीत ब्राह्मीचा निर्माता ‘ब्रह्म’ मानले आहेत. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात, असाही उल्लेख आहे.
(ब्राह्मी लिपी)
बीरुनीने मात्र हिंदू लोक लेखनकला विसरले आहेत, असे सांगितले आहे. पण हे विधान कितपत खरे मानावे हा प्रश्नच आहे, कारण समवायांगसूत्रात आणि पन्नावणासूत्रात अठरा लिपींची यादी आलेली आहे. ‘ललितविस्तर’ या बौद्धग्रंथात तर बुद्धाच्या काळात चौसष्ठ लिपी होत्या, असा उल्लेख आहे.
पण, एकंदरीत पाहता ब्राह्मी, खरोष्ठी, द्राविडी आणि पुष्करसारी अथवा पुखरसारिया याच चार लिपी प्रामुख्याने दिसून येतात. या लिपी महत्त्वपूर्ण असून त्यांना ऐतिहासिक मूल्य आहे.
खरोष्ठी लिपी ही कोणा ‘गर्दभओष्ठ’ (गाढवासारखे ओठ) असणाऱ्या माणसाने शोधून काढली, अशी आख्यायिका आहे. ह्या लिपीचे पुरावे प्रामुख्याने भारताच्या वायव्य व उत्तर सीमाभागात सापडतात. महाराष्ट्रातील जोगलटेंभी येथे सापडलेल्या शहरात राजा नहपानाच्या नाण्यांवर खरोष्ठी आणि ब्राह्मी दोन्ही लिपी आढळतात. पण या लिपीचा भारताच्या दक्षिणेस प्रसार झाला नाही. ब्राह्मीप्रमाणे या लिपीतून नवीन लिपी जन्माला आल्या नाहीत. त्यामुळे कुशाण राजवटीनंतर ही लिपी लुप्त झाली.
(खरोष्ठी लिपी)
अभ्यासकांच्या मते, द्राविडी ही ब्राह्मी लिपीचीच दाक्षिणात्य पद्धत असावी. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील भट्टीप्रोलू येथील स्तूपात अवशेषकरंडकावर या लिपीचा पुरावा सापडतो.
पुष्करसादी (पुष्करसारी) ही लिपी पुष्करसाद नावाच्या आचार्यांनी शोधून काढली असावी, असा एक विचारप्रवाह आहे. कदाचित एखाद्या पुष्करसाद नावाच्या कुटुंबातील माणसाने नवीन लिपी शोधली असावी किंवा आहे त्या लिपीत काही बदल केले असावेत. या दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत.
जैनग्रंथामध्ये ग्रीक लोकांच्या लिपीस ‘यवणालीया’ असे म्हटले आहे. यावरून अलेक्झांडरच्या स्वारीच्या आधीपासूनच भारतीयांना ग्रीक संस्कृती माहीत होती, हे सिद्ध होते.
जैनांच्या नष्ट झालेल्या ‘दृष्टिवाद’ या ग्रंथाचा जो थोडा उपलब्ध भाग आहे, त्यानुसार ब्राह्मी लिपीत ४६ अक्षरे होती. पण अर्वाचीन बाराखडीत मात्र अनेक स्वरांचा समावेश होत नाही, त्यामुळे तिला ‘द्वादशाक्षरी’ म्हणतात. या बाराखडीचा उल्लेख युआन्श्वांग याने केला आहे. तो लिहितो, “भारतीय मुले बाराखडीचा अभ्यास करतात, त्यात सर्व स्वर आणि व्यंजने मिळून ४७ अक्षरे आहेत.”
वैदिक साहित्यात ‘लेखन’ या शब्दाचा कोठेही उल्लेख नसल्याने या काळातील लेखनकलेविषयी अनेक प्रश्न आहेत. काही अभ्यासकांच्या मते हे सर्व साहित्य लिपीच्या शोधाआधीच ऋचाबद्ध झाले असावे. कारण भारतातील मौखिक परंपरा मोठी आहे.
पण महाकाव्ये, पुराणे, स्मृतिग्रंथ, काव्ये, नाटके यात लेखनाचे कितीतरी पुरावे मिळतात. या साहित्यातील मूळ भाग कोणता आणि प्रक्षिप्त भाग कोणता, हे निश्चित सांगता येत नसल्याने, हे पुरावे ग्राह्य धरावेत का, हाच मोठा प्रश्न आहे.
या संदर्भात गौरीशंकर ओझा यांनी वैदिक साहित्याचा अभ्यास करून छंदशास्त्र आणि व्याकरण यांविषयी अनेक पुरावे देऊन या दोन्ही शास्त्रांच्या प्रगतीसाठी मुळात लेखनकला कशी महत्त्वाची आहे, हे सिद्ध केले आहे. या साहित्यात दिसणारे छंद, पदांमधील वर्णसंख्या, स्वर, व्यंजने, घोष, संधी, एकवचन-अनेकवचन, लिंग या सर्वच गोष्टी भाषेची उन्नतावस्था दाखवतात. ही भाषेची उन्नतावस्था आणि लेखनकला या दोन्ही गोष्टींचा फार जवळचा संबंध ओझा यांनी दाखवून दिला आहे.
बौद्ध धर्मग्रंथ ‘विनयपिटक’ यामध्ये लेखनकलेची प्रशंसा केली आहे. विविध जातकांमध्ये लेखन व्यवसाय हा चरितार्थाचे साधन म्हणून येतो. याशिवाय जातकात, खाजगी-राजकीय आज्ञापत्रे, कर्जाऊ रक्कमेचे करार, धर्मनियम, प्रमुख घटनांच्या नोंदी यांचे उल्लेख येतात. जातकाच्या पाठशाळा, फलक, लेखनाची व गणनाची रूपे याचेही उल्लेख येतात. श्रीलंकेतील त्रिपिटकांचा काळ इ.स.पू ५०० ते ४०० मानला जातो. त्यामध्ये ‘छिनत्ति’, ‘लिखति’, ‘लेख’, ‘लेखक’, ‘पर्ण’, ‘फलक’ हे शब्द आलेले आहेत.
पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये ‘लिपी’, ‘लिपीकर’, ‘यवनानी’ हे शब्द येतात. याशिवाय ‘ग्रंथ’ हा शब्द आलेला आहे. पाणिनीच्या पूर्वी यास्काने निरुक्ताची रचना केली; त्यात कित्येक वैयाकरणांची नावे येतात.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात लेखनकलेचे पुरावे आहेत. त्याने मुलाचे चौलकर्म झाल्यावर त्यास अक्षरे आणि पाढे शिकवावेत, असे स्पष्ट केले आहे. लिपी आणि लिपिकार हे शब्द अशोकाच्या लेखातही दिसतात. वात्स्यायनाच्या कामसूत्रात ‘पुस्तकवाचन’ ही चौसष्ठ कलांमधील एक कला मानली आहे. स्मृतिग्रंथात लेखनाचे अनेक पुरावे येतात. तसेच इ. स. पू. आठव्या शतकातील वसिष्ठ धर्मसूत्रामध्ये ‘लेखी पुरावा’ हा कायदेशीर मानला आहे.
अलेक्झांडरच्या निआर्कस या सेनापतीने भारतीय लोक कापूस कुटून तयार केलेल्या कागदावर लिहितात, असे लिहून ठेवले आहे. तर इतिहासकार कर्टीअसने भूर्जपत्रांचा उल्लेख केला आहे. मॅगेस्थेनिसच्या ‘इंडिका’ मध्ये भारतीय लेखनकलेचे अनेक पुरावे सापडतात.
वरील सर्व विवेचनावरून भारतात इ.स.पू ५ व्या शतकापासून लेखनकला होती, हे स्पष्ट होते. अशोकाच्या लेखात तर विविध अक्षरांचे नमुने दिसतात. त्या लेखांमध्ये एकट्या ‘अ’ चे १० प्रकार सापडतात. ओडिशातील हाथीगुंफा येथील इ. स. पू. पहिल्या शतकातील शेवटच्या काळातील खारवेलच्या लेखामध्ये खारवेल राजकुमारास लेखन, पाढे आणि हिशेब या कला येत होत्या, असे वर्णन आहे.
गोखले याविषयी पुढील मत नोंदवितात.
“भारतात मौखिक परंपरेमुळे प्राचीन काळी वेदपठणावरच सर्व भार होता. स्वरांची शुद्धता आणि श्रोत्रीय ब्राह्मणांविषयी आदर कमी होऊ नये, म्हणून पुस्तकातून वेदपठण निषिद्ध मानले गेले. त्यामुळे ग्रंथरचना या सूत्रबद्ध होऊ लागल्या. ज्योतिष, वैद्यक, अंकगणित आणि बीजगणित यासारख्या विषयांची उदाहरणेही श्लोकबद्ध पद्धतीने लोक देऊ लागले. म्हणूनच भारतात प्राचीन लिखित पुरावे नाहीत.”
ब्यूहर आणि रॉथ यांच्या मते, “भारतात लेखनकला प्राचीन असावी. कारण ते म्हणतात की लिखित पुस्तकांशिवाय प्रातिशाख्य होऊ शकत नाही”. बॉथलिंग यांच्या मते, नवीन ग्रंथ लिहिले जात असावेत; पण नंतर ग्रंथकार तो ग्रंथ मुखोद्गत करीत असावा आणि इतरांना शिकवित असावा. त्यामुळे त्या ग्रंथाच्या एका प्रतीचे पवित्र स्मृती म्हणून रक्षण होत असे.
एकंदर पाहता प्राचीन भारतीय लेखनपरंपरेच्या अस्तित्वाविषयी ही मतमतांतरे जरी दिसून येत असली तरीसुद्धा आजपर्यंत सम्राट अशोकाचे ब्राह्मी लिपीतील लेख हेच भारतातील सर्वात प्राचीन लिखित पुरावे म्हणून स्वीकारले जातात.
संदर्भ–
१. पुराभिलेखाविद्या- शोभना गोखले.
२. भारताची कुळकथा- डॉ.मधुकर ढवळीकर.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS.
July 10, 2022
शरयू या MIT School of Government मध्ये सहयोगी संशोधक म्हणून कार्यरत असून प्राच्यविद्या त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.