Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.
सौ. नीलाताई रानडे, धुळे | September 11, 2021 | 0 Comments | 3 Min.
धर्म म्हणजे काय आणि अधर्म कशाला म्हणतात याचे विवरण करताना वेगवेगळ्या प्रसंगातून ते स्पष्ट करता येईल. धर्मशास्त्रात वचनपालन, कर्तव्यपालन याला फार महत्त्व आहे. आपली भारतीय संस्कृती संस्कारांनी जोपासलेली आहे आणि संस्कारात धर्माची जागा फार मोठी वर आहे. त्याची सुरुवात सत्य युगाच्याही आधी त्यावेळच्या ऋषी-मुनींनी केली. त्या संस्कृतीतल्या अनेक घटना त्यांनी अनुसरल्या; प्रत्यय घेतला. त्याचे परिणाम बघितले आणि त्यावरून योग्य वर्तन आणि अयोग्य वर्तन ठरवले. अर्थात योग्य वर्तन ‘धर्म’ असे त्यास संबोधले आणि अयोग्य वर्तनास अधर्म म्हटले.
आपणा सगळ्यांचाच अनुभव आहे की भाषेच्या संप्रेषणातून संवाद घडत असतो आणि मनातील विचार प्रकट होत असतात. म्हणूनच त्या वेळच्या ऋषी-मुनींनी विचारांच्या, विद्वत्तेच्या, तर्कशक्तीच्या, प्रमाणशक्तीच्या आणि निकषांच्या जोरावर काही कृतींचे अर्थ लावले आणि त्या कृतींची धर्म आणि अधर्म या दोन गटात विभागणी केली. धर्म आणि अधर्म याचा अर्थ अधिक स्पष्ट होईल यासाठी काही प्रसंग आपण पाहू.
रामाचे राज्य धर्माधिष्ठित होते म्हणजे काय? न्याय, नीती याची आब राखून वर्तन करणे व करविणे, माणुसकीने वागणे, इतरांना तसे वागण्याचा विनम्र आग्रह करणे, सर्वांचे भले होईल याचा विचार करून कृती करणे, तसे इतरांना वागण्यास प्रवृत्त करणे, न्यायदान करतांना कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे, अन्याय करणाऱ्यास योग्य शासन करणे, समाजावर जाचक कर न लादता त्यांच्या कुवतीचा विचार करून आवश्यक तोच कर वसूल करणे (त्याकाळी कर वसूल करायची वेळच येत नसे. जो तो योग्य तो कर आपणहून भरे.) सर्व सुविधांचा विचार करून दैनंदिन व्यवहार सर्वांना सुखावत होतील अशा सुविधा विना मोबदला उपभोगण्यास उपलब्ध करणे, बाजारात योग्य दराने वस्तूंची खरेदी-विक्रीची योजना, प्रत्येकाच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व वस्तूंचा योग्य भावात पुरवठा, ग्राम स्वच्छतेची सोय, रात्री मशालींसाठी सेवक नियुक्त करणे, कुणी पौरजन संकटात नाही ना, अडचणीत नाही ना यासाठी अपरात्री वेषांतर करून टेहळणी करणे, सीमारक्षणाची योग्य तजवीज इ. सर्वांना आनंदी आणि समाधानी राहण्याचा हक्क असतो तो त्यांना मिळवून देणे हे सर्व माझे काम आहे, जे मी राजा म्हणून करायला हवे अशा समजुतीने रामाने राज्य चालविले. म्हणून रामाचे राज्य धर्मधिष्ठित होते असे म्हणतात. त्यालाच आपण ‘राम राज्य’ असे म्हणतो.
ते राज्य त्यावेळी श्रीरामांनी केले म्हणून आपण ‘रामराज्य’ म्हणतो. या ठिकाणी अन्य कोणताही राजा असता आणि त्याने वरील प्रमाणे राज्य केले असते तर त्यावेळी त्या राजाचे नाव घेऊन त्या राज्याचे विशेषण निर्माण झाले असते. आज आपण उत्तम राज्यपद्धती रामाने केली आणज त्याला ‘रामराज्य’ही संज्ञा दिली. त्यामुळे धर्म म्हणजे काय याची व्याख्या करायचीच ठरवली तर असं म्हणता येईल की वर्तनाच्या आधी, निर्णयाच्या आधी, बोलायच्या आधी, कृती पूर्वी विवेकाला स्मरून, उचित-अनुचित पाहून विधायकतेच्या विचारातून, कर्माच्या प्रयोजनाचे सत्य जाणून, त्याच्या परिणामांचा विचार करून, भविष्यात ते परिणाम विचारात घेऊन जें वर्तन घडते त्याला धर्माधिष्ठित वर्तन म्हणू शकतो. पण तरीसुद्धा अधर्म म्हणजे काय हा प्रश्न राहतोच. वरील वर्तनाच्या विरोधी वर्तन म्हणजे अधर्म असे नुसते सांगून वाचकहो, मी वेळ मारून नेणार नाही. त्यासाठी काही प्रसंग पहिले तर अधर्माचा उलगडा होईल.
कसे असते पहा – कोणत्याही रोगावर औषध असतंच; पण रोग होऊ नये म्हणून काही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी कोणते उपाय करायचे याचाही विचार आपण करतो. अगदी तसेच धर्मबाह्य वर्तन होऊ नये या साठी मी काय टाकायला पाहिजे हे समजले पाहिजे ना ! तरच धर्म जागवता येईल, आणि जगत राहील. वर म्हटल्याप्रमाणे धर्मशास्त्रात कर्तव्यपालनाला फार महत्त्व आहे. त्राटिका वधाचा प्रसंग पहा. वास्तविक आपल्या धर्मशास्त्रात ‘स्त्री ‘ ही अवध्य आहे. तरी विश्वामित्र रामांना त्राटिकेचा वध करायला सांगतात. कारण मुद्दा धर्माचा आहे. त्यामुळे रामांना शंका आली. त्यावेळी विश्वामित्रांनी रामांना समजावून सांगितले, ‘ रामा, आपला धर्म खूप सूक्ष्म आहे ‘. म्हणजे काय तर ते सांगतात, ‘आपल्या धर्मात, धर्मशास्त्र एखादी गोष्ट कधीच करू नये असे सांगितले असले तरी ती गोष्ट कधी केली तरी चालते हे सांगितले आहे आणि एखादी गोष्ट केलीच पाहिजे असे सांगितलेले असते त्यावेळी ती कधी केली नाही तरी चालते हे देखील सांगितलेले असते. म्हणून रामा, आपल्या धर्मात स्त्रीला ठार मारू नये असे सांगितले असले तरी तू या त्राटिका नामक स्त्रीला ठार मार. कारण स्त्री म्हणून काही ठोकताळे आहेत. स्त्री ही सृजनशील असते, ती संगोपन करते, संस्कार करते, प्रेम-स्नेह लावते, मूल मोठे होईपर्यंत त्याच्या सर्व गोष्टींकडे लक्ष्य देते,त्याची स्वच्छता ठेवते, त्याला वाढवते, रक्षण करते, त्याला आश्रय देऊन मोठे करते. हे सर्व त्राटिका कुठे करते आहे? मग तिला स्त्री कसे म्हणावे? तिच्या अस्तित्वाने समाजाला त्रास होत असेल आणि ती जर येईल त्याचे रक्षण न करता भक्षण करीत असेल तर ती असण्याची काहीच आवश्यकता नाही. तिला ठार मारणेच उचित आहे. तू इक्ष्वाकू कुळाचा भावी राजा आहेस. तेव्हा तू हे काम कर. इथे रामांना हे समजल्यावर राम म्हणतात,
गोब्राह्मणहितार्थाय देशस्य च हिताय च
तव चैवाप्रमेयस्य वचनं कर्तुमुद्यतः ।।
याचा अर्थ असा गाई-ब्राह्मण (चतुष्पादांपासून माणसांपर्यंत) सर्वांच्या हितासाठी आणि देशहितासाठी मी हे करीन. आपले कर्तव्य मानून रामाने त्राटिका वध केला. त्राटिका वध हे धर्मकृत्यच होते. धर्मशास्त्राप्रमाणेच राम वागले. रामचरित्रात अनेक वर्तनातून रामांनी कर्तव्य निभावण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. सर्व घटना टाळून आणखी एकच प्रसंग सांगते.
त्याने त्राटिकेला मारले नसते तर तो अधर्म झाला असता. श्रीरामांचे सर्व कार्य मपूर्णत्वाला गेल्यावर काळपुरुष रामांना भेटायला येतात. त्यावेळी कुणाला काही कळू नये म्हणून प्रासादात न बसता राम व काळपुरुष शस्त्रागारात बसतात. दारावर लक्ष्मणाला पहारा देण्यासाठी ठेवतात. त्याला सांगतात, ‘दरवाजा मी आतून उघडल्याशिवाय बाहेरून तू उघडायचा नाही. कुणाला आत येऊ द्यायचे नाहीस. जर तू हे केले नाहीस तर मृत्युदंडाची शिक्षा तुला होईल.’ पण दुर्वास ऋषींच्या आग्रहास्तव लक्ष्मण दरवाजा उघडतो. प्रतिज्ञास्वरूप रामांनी योग्य वर्तनाची ग्वाही दिली होती. म्हणजे धर्माला धरून रामाने लक्ष्मणाला मृत्युदंड द्यायला हवा. लक्ष्मणाचा दरवाजा उघडण्याचा हेतू अत्यंत प्रांजळ आणि अयोध्यावासींच्या रक्षणाचा होता. पण रामांनी आपला शब्द पाळावा असे वसिष्ठानी सांगितले. ‘प्रतिज्ञा पाळणे’ धर्मकृत्य आहे. तसे न केल्यास अधर्म होईल. प्रतिज्ञा मोडलीस तर धर्माचा नाश होईल. धर्मनाश म्हणजे त्रैलोक्याचा नाश! म्हणून तू लक्ष्मणाचा त्याग कर! इथे धर्म काय ते कळते. वचनपालन, कर्तव्यपालन धर्मात किती महत्वाचे होते हे समजते. ज्या ज्या वेळी त्या त्या परिस्थितीत त्या त्या भूमिकेत योग्य ते धर्मात बसणारे असते. श्रीराम राजा होता आणि राजा जर बोलल्याप्रमाणे वागणारा नसेल तर प्रजेने आदर्श कुणाचा पाळायचा? ह्यामुळे त्यावेळी रामाने राजाचे कर्तव्य म्हणून धर्म पाळला आणि लक्ष्मणाला मृत्युदंड दिला. इथे रामाने लक्ष्मणाला शिक्षा केली नसती तर अधर्म घडला असता. रामायण ग्रंथात स्वतः वाल्मिकींनी सुग्रीवाला धर्मात्मा म्हटले आहे. का? काय कारण? वास्तविक सुग्रीवाची काही चूक नसताना वालीमुळे त्याला राजत्याग करावा लागला. किष्किंधा राजधानी सोडून वनात जावे लागले. पण त्यावेळी सुग्रीवाच्या मनात कोणतेही छळ-कपट आले नाही. मोठ्या भावाचे म्हणणे त्याने ऐकले आणि तो वनात आला. खरे तर त्याच्या बरोबर हनुमंतासारखा बुद्धिमान, शूर, सुग्रीवाशी निष्ठा असणारा दूत होता. त्याला बरेच काही करता आले असते. पण मोठ्या भावाशी वैर धर्मात बसत नाही असा विचार त्याने केला आणि म्हणून धर्मबाह्य वर्तन संकट आले तरी न केल्यानेच वाल्मिकी त्याला धर्मात्मा म्हणतात. याच प्रसंगाकडे नीट पहिले तर सुग्रीवाशी रामाची मैत्री झाल्यावर त्यांनी तुझे राज्य परत मिळवून देईन असे वचन दिले. आता इथेसुद्धा रामांना वचनाला जागायचे होते. त्यासाठी रीतसर युद्ध न करता वालीला ठार मारले. हे कृत्य मात्र धर्मकृत्य मानले गेले का? “असंगाशी संग प्राणाशी गाठ” म्हणतात तेच खरे. वालीने रावणाशी मैत्री केली होती. रावणाने स्वतःचे चौदा हजार सैन्य वालीला रक्षणासाठी दिले होते. त्यांच्यात एकमेकांना मदत करायचा करार झाला होता. अधर्माने वागणाऱ्याला सहकार्य करणे हेही अधर्मच मानले जाते. त्यामुळे त्या अधर्मी वालीला ठार मारणे हे रामाच्या ध्येयपूर्तीसाठी, वचनपूर्तीसाठी, कर्तव्यपालनासाठी, वालीशी मैत्री करण्यासाठी आणि पुढे जाऊन रावण वधासाठी आवश्यक होते. त्यामुळे धर्मात्मा सुग्रीवाला सहकार्य करून रामाने धर्मकृत्य केले होते. तसेही वालीने रामांना विचारल्यावर त्याच्या अधर्म वर्तनाचा पाढा रामाने वाचला होता.
१) भावाची बाजू न ऐकता त्याच्यावर अन्याय केला
२) अधर्म करणाऱ्याला सहकार्य
३) पतिव्रता भावजयीशी व्यभिचार
४) भावाशी प्रतारणा ह्या अधर्म कृत्य करणाऱ्या वालीला रामाने दंड देऊन एक प्रकारे धर्मकार्यच केले. न कळत झालेल्या अधर्मासाठी महाराज दशरथाने यज्ञ करून अमाप दान करून धर्मकृत्य केले. कैकेयीला दिलेल्या वचनाचे पालन करून धर्म पाळणे. पण त्याचा विपरीत परिणाम झाला, असे आपल्याला वाटते. पण दशरथाच्या वचनपूर्तीतूनच रामाने वडिलांना वचन दिले की आपल्या आज्ञेनुसार मी वनात जाईन म्हणजे वडिलांचे दिलेले वचन मिथ्या होऊ नये यासाठी राम वचनबद्ध होतात आणि स्वतः दिलेले वचन पाळण्यासाठी पुढे राम वनात जातात. ह्या वचनांमुळे दोघांनीं धर्मकृत्य केले. वाचकहो एक गोष्ट इथे विसरून चालणार नाही ती अशी की प्रत्यक्ष भगवंताने मी पृथीवर अवतार होतो आहे आणि ह्यापुढेही येईन असे म्हटले होते. अधर्माचे राज्य राजरोस चालू झाल्यावर त्यांना शासनासाठी प्रभूंनी अवतार घेतले.
महाभारतातील एक मोठी घटना पहा. पितामह भीष्म अत्यंत बुद्धिमान, नीतीवंत प्रचंड पराक्रमी असूनही वचनपूर्तीसाठी त्यांना कौरवांच्या अधर्माला थांबवता आले नाही. अधर्माला शरण जावे लागले. शेवटी अधर्माचा नाश झाला आणि धर्म जिवंत राहिला. धर्म (युधिष्ठिर) राजा झाला.
रामायणातील राम-रावण युद्ध धर्मयुद्ध मानले जाते. वाल्मिकींनी स्वतः सांगितले आहे हे युद्ध धर्मासाठी होते. रावणाच्या वधामुळे अनेक देव रावणाच्या बंदीगृहातून मुक्त होणार होते. रावणाच्या पापी व अधर्मी कृत्यांना कायमचा विराम मिळणार होता. अनेक राजे व समाज निर्धास्त होणार होता. सर्वत्र सुख, आनंद, समाधान, निर्भयता, शांतता, नैतिकता प्राप्त होणार होती म्हणून हे धर्मयुद्ध होते.
तपश्चर्या करणे हे देखील धर्मकृत्य मानले जाते. तपश्चर्येचा हेतू जर जनहिताचा असेल तर त्याची फलश्रुती देखील चांगलीच असायची. वैयक्तिक लालसेतून केलेली तपश्चर्या ही अधर्म मानली जायची. तपश्चर्येनंतर दान करणे त्यावेळी आवश्यक मानले जायचे. “सौदास” राजाने दान न देताच तपश्चर्या केल्याने ते कृत्य धर्मबाह्य मानले गेले व त्याला मरणानंतर नरक प्राप्त झाला, असे त्यावेळचे ब्राह्मण म्हणत आणि ते सर्वांना सर्वथैव मान्य होते. आता ह्यापुढे “धर्म” ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, ते पाहू.
धर्म म्हणजे कर्तव्यपालन. वृद्धापकाळी मातापित्यांचा सांभाळ करणे हे पुत्राचे कर्तव्य पुत्रधर्मच असतो. माणसाला हक्क आणि अधिकार हवे असतात, पण कर्तव्याकडे सहज दुर्लक्ष कसे करायचे हे देखील माणसाला चांगले जमते. शिक्षकाने विद्यार्थ्याला समजेपर्यंत समजावले/ शिकवले पाहिजे, हा शिक्षकाचा धर्म. मातेची मुलांबाबत खूप कर्तव्य असतात. ती सर्वश्रुतच आहेत आणि ती सर्वथैव पाळली जातात. इथे प्रत्येक भूमिकेमागे कर्तव्य येतेच. तसेच धर्म म्हणजे स्थायी भाव. विंचवाचा डंख मारणे हा धर्मच आहे. नाग-साप-नागतोडा ह्यांचा चावणे हा धर्मच आहे. कुरतडणे हा उंदराचा धर्म आहे (कुर्तडण्याशिवाय त्याचे भक्षणही तो करू शकत नाही). धूर्तपणा कोल्ह्याचा स्थायी भाव आहे. आनंद व्यक्त करतांना पिसारा फुलवणं हा मोराचा स्थायी भाव आहे, धर्म आहे. तसेच मानवता हा माणसाचा धर्म आहे. हा धर्म त्याला निसर्गानेच दिला आहे. निसर्गाचे देणे कधीही चुकीचे नसते. म्हणून मनुष्याचा स्थायीभाव त्याला मनुष्य धर्म म्हटले जाते. त्यामुळे माणुसकीला शोभेल असे वर्तन ते धर्माधिष्ठित वर्तन आणि माणुसकीला काळिमा फासणारे, लांच्छनास्पद कृत्य ते अधर्म असे म्हंटले जाऊ लागले. आणखीन एक अर्थ जो आज जास्त प्रचलित आहे तो म्हणजे धर्म म्हणजे Religion. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिस्ती धर्म, शीख धर्म, बुद्ध धर्म. त्या त्या धर्माची काही तत्वे असतात . आचारपद्धती, रहाणीमान, सण -उत्सव, पेहराव इत्यादींमध्ये फरक असतो. पण Religion ह्या अर्थी रामायणात “धर्म” हा शब्द कुठेच आलेला नाही.
आपण ‘धर्म -संकट’ हा शब्द अनेकवेळा वापरतो. ज्यावेळी काय करू असा प्रश्न पडतो त्या अवस्थेला धर्म संकटात पडणे हा अर्थ अभिप्रेत असतो. शिबी राजाला एका पक्षाला वाचवण्यासाठी दुसऱ्या मोठ्या पक्षाला आपल्या मांडीचे मांस काढून देऊन त्या छोट्या पक्षाचे प्राण वाचवावेसे वाटले. पण हा निर्णय घेण्याआधी दोघांवर अन्याय होऊ नये असे शिबी राजाला वाटत होते. त्यावेळी त्याला वाटले ” काय हे धर्म संकट आहे? मी धर्माला न्याय देऊ की त्या पक्षाला मरू देऊन अधर्म करू ?” ससाण्याचे खाद्य त्याला मिळाले पाहिजे. “जीवो जीवस्य कारणम् ” या न्यायाने त्याला न्याय द्यायला हवाच. पण जो आपल्या आश्रयाला आला त्याला प्राणदान देणे हे माझे (धर्म)कर्तव्य आहे. राजाला काय करावे हा प्रश्न पडला . या अवस्थेलाच धर्मसंकट म्हणतात. धर्मसंकटातूनही मुक्त होण्यासाठी धर्मानुचरण करतांना फायदा/तोटा बघायचा नसतो. तर धर्माला (कर्तव्याला) महत्त्व द्यायचे असते. मराठी भाषेत ‘धर्म’ ह्या शब्दाला उपपद लावून असे बरेच शब्द आहेत. जो चांगले कर्म जाणतो तो धर्म जाणतो. कर्म विचारात असते तेव्हाच वर्तनात धर्म येतो. आता ‘धार्मिकता’ हा एक शब्द. धर्म शब्दावरून धार्मिकता हा शब्द आला. पण इथे ह्या धार्मिकतेशी कर्तव्य, वचन, प्रतिज्ञा ह्याचा काहीच संबंध नाही. इथे धार्मिकता हा शब्द ‘आस्तिक’ ह्या शब्दाच्या जवळचा आहे. धर्म नेहमी चांगल्या गोष्टींचाच आग्रह धरतो. ईश्वरावर श्रद्धा असणे, त्याचे अस्तित्व मान्य करणे हे धार्मिकतेत अंतर्भूत असते. धार्मिक व्यक्ती कधीच चुकत नाहीत असे काही नसते. धार्मिक व्यक्तीकडूनही अधर्म कृत्य होऊ शकते. कारण धार्मिकता ही एक जीवनशैली आहे, एक मानसिकता आहे. त्या मानसिकतेतून मनुष्य धर्मकृत्य करीत असतो. धार्मिकतेच्या सहभावना, सहकार्य, संस्कार, सुवर्तन अपेक्षित असते. इथे त्या व्यक्तीच्या धार्मिकतेमुळे त्याचा मित्रपरिवार वाढतो. साहजिकच अनेकांचे आशीर्वाद मिळतात. थोडक्यात माणुसकीने, नीतीने, प्रामाणिकपणे वागणे जे मानव जाणतील ते भूषणावह ठरतील असे वर्तन धर्मवर्तनात येते.
तळटीप : प्रस्तुत लेखमाला ही प्रामुख्याने वाल्मिकी रामायणावर आधारित आहे.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS
September 11, 2021
सौ. नीलाताई रानडे ह्या वाल्मिकी रामायणाच्या अभ्यासक आहेत..