Saṁbhāṣā | संभाषा

Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.

समाजक्रांतिकारक सावरकर

अक्षय जोग |  May 01, 2020  |  0 Comments | 3 Min.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजसुधारणेचे महान कार्य तसे दुर्लक्षित केले गेले आहे. आधी स्वराज्य की समाजसुधारणा ह्यावर सावरकर म्हणतात, ‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही.’ ‘मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका’ असे सांगणाऱ्या सावरकरांना आपल्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा समाजसुधारणेचे कार्य किती महत्वाचे वाटत होते ह्याची प्रचिती येते.


हिंदुत्व, हिंदूराष्ट्र मांडणारे क्रांतिकारक सावरकर समाजक्रांतिकारकही होते हे विसरता कामा नये. समाजसुधारक व समाजक्रांतिकारक यातील फ़रक धनंजय कीरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रात नोंदविलेला आहे. कीर म्हणतात, ”सुधारक जुन्याच बांधकामाची पुनर्बांधणी करतो तर क्रांतिकारक जुनी इमारत उद्ध्वस्त करतो व नव्याची उभारणी करतो.” सावरकर हे नुसते समाजसुधारक नव्हते, तर ते एक कृतिशील समाजक्रांतिकारक होते.

ब्रिटिशांची परदेशी शृंखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने ‘वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी’ ह्या सात स्वदेशी शृंखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात.

 

 

सात स्वदेशी शृंखला- सप्तबेड्या
वेदोक्तबंदी – सर्व हिंदूंना वेदादीक धर्मग्रंथावर समान हक्क असावा.

व्यवसायबंदी – ज्या व्यक्तीस जो व्यवसाय करायची इच्छा व धमक असेल, त्या व्यक्तीस तो व्यवसाय करण्याची अनुमती असावी. अमक्या जातीत जन्मला म्हणून तमका व्यवसायच करावा, इतर व्यवसाय करु नये ही जबरदस्ती असता कामा नये.

स्पर्शबंदी – ‘अस्पृश्य जातीची अस्पृश्यता ही तर निव्वळ मानीव, पोथीजात माणुसकीचा कलंक, ती तर तात्काळ नष्ट झाली पाहिजे.’ असे सावरकर स्पष्टपणे म्हणतात.

सिंधुबंदी – परदेशगमन जातीबहिष्कार्य पाप ठरवू नये.

शुद्धीबंदी – पूर्वी परधर्मात गेलेल्या किंवा जन्मत: परधर्मीय असलेल्या अहिंदूंना हिंदूधर्म स्वीकारायचा असल्यास तशी सोय उपलब्ध असावी. सावरकरांनी रत्नागिरीत शुद्धीकार्यही केले होते.

रोटीबंदी – ‘खाण्याने जात जाते, धर्म बुडतो’ ह्या खुळचट कल्पना आहेत असे म्हणणारे सावरकर ‘धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नव्हे’ असे सांगतात. रोटीबंदी तोडण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात सहभोजने घडवून आणली होती.

बेटीबंदी – विवाहासाठी जात हा निकष असू नये. गुण, शील, प्रीती, आरोग्य या गोष्टी अनुरुप आहेत का हे पाहावे.

आपले सामाजिक विचार मांडण्यासाठी सावरकरांनी ‘संगीत उ:शाप’ हे नाटक, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘क्ष’ किरणे, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ ह्यासारखे ग्रंथ तसेच कविता, कथा असे विविध वाडमयीन प्रकार हाताळले होते. सावरकर एक कृतिशील विचारवंत होते, त्यामुळे सावरकर नुसते विचार मांडून थांबले नाहीत. सहभोजन, मंदिरप्रवेश, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या मुलांना शाळेतून एकत्र बसवणे, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांसह घरोघरी दसरा व संक्रांतीला सोने व तिळगूळ वाटप, बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेला पूर्वास्पृश्यांचा बँड, १९२९पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवातील भंगीबुवांचे कीर्तन, महिलांची प्रकट भाषणे असे अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी यशस्वी केले.

 

१९३३ला रत्नागिरीत अखिल हिंदू उपहारगृह काढले, जेथे पुर्वास्पृश्य पदार्थवाटपाचे काम करत व सावरकर त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तीस आधी उपहारगृहात जाऊन चहा पिऊन येण्याची अट घालत. १९३१ला सर्व हिंदूंना खुले व ज्याच्या न्यासावर पूर्वास्पृश्यांसह सर्व जातींचे पुढारी असतील असे ‘पतितपावन मंदिर’ सावरकरांच्या प्रेरणेने व भागोजी कीर ह्यांच्या आर्थिक पाठबळामुळे सुरू झाले. ‘जुन्या देवळाचा प्रश्न नव्या देवळातील सांघिक पूजेच्या सवयीने अधिक लवकर सुटेल’ हे जाणूनच पतितपावन मंदिर बांधण्यात आले होते.१ या व अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी रत्नागिरीसारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात कायापालट घडवून आणला.
त्यावेळी गायत्री मंत्र नि वेदमंत्र हे अधिकार ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते. अशावेळी अखिल हिंदू गणेशोत्सवात एका भंगी हिंदूने गायत्री मंत्र नि वेदमंत्र म्हटले, या प्रकरणाचे निनाद लंडनच्या काही वृत्तपत्रांमधूनही घुमले होते.२

५० वर्षांची दोन जन्मठेपेंची शिक्षा ठोठावल्यावरसुद्धा जे सावरकर भावनिक झाले नाहीत तेच सावरकर १९३१ला ‘मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवास मला पाहू द्या’ हे पूर्वास्पृश्यांसाठी मंदिरप्रवेशाचे गीत लिहिताना अत्यंत भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.३

 

ब्रिटिश शासनाकडून मिळणारे तुटपुंजे वेतन व इतर चरितार्थाची साधन अल्प असतानाही सावरकरांनी एका पूर्वास्पृश्य मुलीला दत्तक घेतल होत. सन १९२९च्या डिसेंबर महिन्यात ज्या रत्नागिरी हिंदू सभेतर्फे सावरकर कार्य करीत होते, तिच्यापाशी केवळ सव्वा रूपया शिल्लक होता. ह्यावरून आपल्या लक्षात येईल की किती आर्थिक, सामाजिक व राजकीय़ प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांनी समाजकार्य केले होते.


समाजसुधारणेविषयी आपले विचार मांडताना सावरकरांनी धर्मग्रंथ, समाजसंस्थेचा पाया, जातिभेद ह्याविषयी मूलगामी विचार मांडले आहेत. ‘धर्मग्रंथावर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले. उद्या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करावयाची ती प्रत्यक्ष ऐहिक नि विज्ञाननिष्ठ अशाच तत्वांवर केली पाहिजे’४ ‘सामाजिक क्रांतीस यशस्वी करण्यासाठी आजच्या जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करून जाती-जातीतील विषमता आधी नष्ट केली पाहिजे.५ ‘हा पोथिजात जातिभेद भंग्यांनासुध्दा डोंबावर उच्च जातीयता गाजवायला मिळे, म्हणून त्या-त्या प्रमाणात साऱ्यांनाच हवासा वाटला म्हणून तो टिकला आहे, टिकून आहे. तो आजही कारण नसता टिकविण्य़ाचा दोष साऱ्यांचा…तो सुधारण्याचे दायित्व साऱ्यांचे’६
रत्नागिरीला आल्यावर राजकारणात भाग घेता येणार नाही म्हणून हिंदूसंघटनेच्या दृष्टीकोनातूनच सावरकरांनी अस्पृश्यतानिवारण केले असा आरोप करणाऱ्यांनी सावरकरांनी बंधू नारायणरावांना अंदमानातून दि.६-७-१९२०ला लिहिलेले पत्र वाचावे. ‘हिंदुस्थानवरील परकीयांच्या स्वामित्वाविरूध्द बंड करून उठावेसे जितके मला वाटते तितकेच मला जातिप्रथा व अस्पृश्यता यांच्याविरूध्दही बंड करून उठावेसे वाटते.’


‘आमच्या सात कोटी धर्मबंधूंना निष्कारण पशुहूनही ‘अस्पृश्य’ लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे, तर आपल्या स्वत:च्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय, म्हणून ती निघाली (उच्च्चाटन झाले) पाहिजे….त्या रूढीपासून हिंदू समाजाचा आंशिक लाभ जरी होत असता, तरीहि आम्ही तिच्याविरूध्द तितक्याच प्रखरपणे खटपट केली असती…तो मनुष्याविरूध्द एक अत्यंत गर्ह असा अपराध आहे.७ सावरकरांचा समाजसुधारणेमागील हेतू मानवता हाच होता.


१९४७ला ‘दलित सेवक’चे संपादक ‘वि न बरवे’ ह्यांना लिहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात,’जर क्वचित माझी प्रकृती सुधारून सार्वजनिक कार्यात पडण्याइतकी शक्ती आली तर ह्या अस्पृश्यतेच्या नि पोथिजात जातिभेदाच्या उच्चाटनाचे कार्यच निदान एक दोन वर्ष तरी करावे आणि त्या घातक रूढीवर आणखी एक अखिल भारतीय चढाई करावी असे वारंवार मनात येते. इतके हे कार्य मला केवळ हिंदू संघटनार्थच नव्हे तर मानवी संघटनार्थही निकडीचे वाटते.८ म्हणजे रत्नागिरीहून सुटल्यावर राजकारणाच्या धामधुमीत व भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाही सावरकरांच्या मनात जातिभेदाचे समूळ उच्चाटन हाच विचार होता. १९३९च्या कोलकाता, १९४१च्या भागलपूर व १९४२च्या कानपूरच्या हिंदूमहासभा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सावरकरांनी ‘अस्पृश्यतानिर्मूलनाचा’ तात्कालिक कार्यक्रमात समावेश केला होता. १९३७ला संपूर्ण मुक्तता झाल्यावर सावरकरांनी अस्पृश्यतानिवारण केले नाही असा आरोप करणाऱ्यांनी वरील गोष्टींची नोंद घ्यावी. रत्नागिरीहून सुटल्यावरही विविध दौऱ्यात पूर्वास्पृश्य वस्तीला भेट व सहभोजन हे कार्यक्रम होत असत. राजकारण असो वा समाजकारण सावरकरांनी सदैव मानवतेचा विचार केला होता.

------------

 

संदर्भ
१. मोरे, शेषराव, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, राजहंस प्रकाशन, दुसरी आवृत्ती, २०१०, पृष्ठ १७३ व दाते, शं रा, समग्र सावरकर वाड्मय-खंड ३, समग्र सावरकर वाड्मय समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंसुसभा, पुणे १९६३-६५, पृष्ठ ४९२
२. कीर, धनंजय, अनुवाद: द.पां.खांबेटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पाप्युलर प्रकाशन, तिसरी आवृत्ती, २००९, पृष्ठ १९६
३. बापट, ना.स., स्मृतिपुष्पे, प्रकाशक- ना.स.बापट, १९७९, पृष्ठ ६३
४. समग्र सावरकर वाड्मय-खंड ३, पृष्ठ ६५३
५. उपरोक्त, पृष्ठ ६४१
६. उपरोक्त, पृष्ठ १७८
७. उपरोक्त, पृष्ठ ४८३
८. सावरकर, बाळाराव, स्वातंत्र्यवीर सावरकर- अखंड हिंदुस्थान लढा पर्व, वीर सावरकर प्रकाशन, १९७६, पृष्ठ ३६९-३७०

 

--------------

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *