Saṁbhāṣā | संभाषा

Saṁbhāṣā literally means a ‘discourse’ or a ‘discussion.’ This pillar inquires into political, social and economic strands of the Indian thinking and brings to light some of the prominent debates, discourses and propositions emanating from the Indian thinkers or having direct resonance to Indian realities.

संस्कृतभाषा – गैरसमज, वास्तव आणि गरज

डॉ. प्रसाद भिडे |  May 07, 2020  |  0 Comments | 3 Min.

भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्या बरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवती देखील सामूहिक अस्मिता विणली जात असते. कधी नकळतपणे हा भाषिक अस्मितेचा अंकुर इतक्या जोमाने वाढतो की त्याचं नांगीत रुपांतर होतं आणि परिणाम म्हणून दुस-या समूहाची भाषिक अस्मिता दुखावली जाते. त्यानंतर सुरू होतो तो भाषिक अस्मितांमधील संघर्ष, आपापल्या भाषेचं मोठेपण ठसवण्याची चढाओढ, त्यासाठी आपापल्या भाषांचं प्रसंगी अवास्तव असं केलं जाणारं उदात्तीकरण. अशा अवास्तव उदात्तीकरणामुळं ती भाषा वर्तमान आणि वास्तव या दोन्हीपासून दुरावते. तामिळ, हिंदी, मराठी या भारतीय भाषा कमीअधिक प्रमाणात या अडचणीत सापडलेल्या आहेतच. संस्कृतभाषा या संदर्भातही सर्व भारतीय भाषांची अग्रणी ठरावी अशी स्थिती आहे. भारताचा इतिहास आणि संस्कृती यांच्याशी संस्कृताचा घनिष्ठ संबंध असल्याने परिस्थिती अधिकच नाजुक बनली आहे. त्यात गेल्या काही वर्षात संस्कृतच्या प्रसारासाठी झालेले प्रयत्न प्रामुख्याने भावनिक पातळीवर अधिक राहिल्याने त्यातून काहीवेळा अस्मितांच्या संघर्षांचे प्रसंगही अगदी स्वाभाविकपणे निर्माण झाले. या सा-याचा परिणाम म्हणून संस्कृतविषयक अस्मितेच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही बाजुंनी काही गैरसमज बळावत आहेत. यापैकी काही वरवर क्षुल्लक वाटले तरी ते ‘मास लेवेल’  म्हणजे जनसामान्यांमध्ये पसरलेले असल्याने गंभीर आहेत.

 

काहीवेळा निव्वळ भाषिक अस्मिता चेतवण्यासाठी म्हणून, ‘संस्कृत ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे’, ‘सर्व भारतीय भाषांची जननी म्हणजे संस्कृतभाषा’ , ‘सर्व युरोपीय भाषांचा उगम देखील संस्कृतातूनच झाला आहे’ अशी ढळढळीत असत्य आणि अशास्त्रीय विधाने केली जातात. आत्ता आपण जी संस्कृतभाषा वाचतो/बोलतो (अभिजात संस्कृत)  तिच्याहून प्राचीन अशी वैदिक बोली (ऋग्वेद इ. ची भाषा) खुद्द भारतीय उपखंडातच होती. भारतात वर्तमान स्थितीत किमान चार भाषाकुले अस्तित्वात आहेत. त्यापैकी निव्वळ एका भाषाकुलाशी संस्कृत भाषा संबंधित आहे. मग इतर भाषांचा उगम तिच्यातून कसा होईल? अश्या विधानांमुळे तामिळ सारख्या प्राचीन भाषेच्या भाषकांची अस्मिता दुखावली गेली तर दोष कुणाचा? संस्कृतभाषा ही इंग्रजी भाषेची देखील जननी आहे हे सिद्ध करण्यासाठी शब्दांचा तौलनिक अभ्यास करुन समोर मांडला जातो. मात्र, इंग्रजीतील ‘मदर’ आणि संस्कृतातील ‘माता’ या शब्दांमधील साधर्म्यामुळे संस्कृत इंग्रजीची आई कशी होईल? उलट संस्कृत आणि इंग्रजी ही एकाच आईची लेकरं आहेत हा निष्कर्ष भाषाशास्त्रीदृष्ट्या अधिक तर्कसंगत ठरतो. अश्या गैरसमजुतींचा प्रसार झाल्याने आणि तसाच प्रतिवाद होत राहिल्याने संस्कृताचं खरं महत्त्व मागेच पडतं. वास्तव हे आहे की, काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यन्त आणि महाराष्ट्रापासून पूर्वोत्तर राज्यांपर्यन्त कुठल्या ना कुठल्या काळात आणि कुठल्या ना कुठल्या स्वरुपात पोहोचलेली भाषा म्हणजे संस्कृत ! आजची हिंदी देखील एवढी प्रसृत नाही. यामुळेच बहुधा हिंदीला भारताची अधिकृत भाषा (राजभाषा नव्हे) म्हणून मान्यता मिळण्यास विरोध निर्माण झाल्यावर डा. आंबेडकरांनी  नोव्हेंबर १९४९ मध्ये संस्कृत भाषेच्या पर्यायाला अनुकूलता दर्शवली असावी.

 

एकीकडे असे गैरसमज पसरत असताना, दुसरीकडे इतर सामूहिक अस्मिता दुखावल्या जाण्यातूनही संस्कृत भाषेविषयी नकारात्मकता निर्माण होते. उदाहरणादाखल, “संस्कृत ही प्रामुख्याने हिंदू धर्माचीच भाषा होती”, “ती ब्राह्मणांनी स्वतःचं श्रेष्ठत्व जपण्यासाठी वापरलेली ब्राह्मणांची भाषा आहे” किंवा “संस्कृत ही कधीच बोलीभाषा नव्हती”  अशी काही विधानं सांगता येतील. अश्या विधांनांचा पाया शास्त्रीय कमी आणि भावनिक अधिक असतो. हिंदू संस्कृतीचे श्रुती – स्मृती – पुराण हे धार्मिक वाङ्मय  संस्कृतात आहे हे खरच आहे. मात्र, संस्कृतात केवळ एवढच वाङ्मय नाही. संस्कृत ही निव्वळ धार्मिक साहित्याची भाषा नाही. दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात बहरलेल्या संस्कृतीची, ज्ञानपरंपरेची भाषा आहे. ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृतीसोबतच तिला पर्याय म्हणून काळाच्या प्रत्येक टप्यावर निर्माण झालेल्या इतरही शाखांचं मिश्रण आहे. ह्या प्रत्येक टप्प्यावर संस्कृतभाषा होती. प्राचीन तसेच अर्वाचीन अश्या सर्व शास्त्रांशी संबंधित वाङ्मय, सर्व विचारप्रणालींशी निगडित काव्यं, नाटकं संस्कृतात आहेत. जैन आणि बौद्ध परंपरेतील काही ग्रंथ, अश्वघोषाचे बुद्धचरितम् सारखे महाकाव्य  अशी विपुल साहित्यसंपदा असलेली संस्कृतभाषा फक्त हिंदू धर्माची भाषा कशी? अभिजन वर्गात अधिक प्रसार झाला म्हणून ती फक्त ब्राह्मणांची भाषा मानून तिचा द्वेष करण्याची गरज नाही. संस्कृतातील रामायण, महाभारत या आद्य साहित्याचे निर्माते वाल्मीकी आणि व्यास किंवा महाकवी कालिदासाची जात शोधण्याचा प्रयत्न केला तर उपलब्ध आख्यायिकांनुसार हे सगळे जन्माने ‘ब्राह्मण’ होते असा निष्कर्ष नक्कीच निघणार नाही. मग तिला ब्राह्मण्याच्या पाशात आवळून वर्ज्य का मानावी? संस्कृत ही कुठल्यातरी समाजात, कुठेतरी, कधीतरी, बोलली जाणारी भाषा असल्याशिवाय त्यात इतकं समृद्ध काव्य, नाट्य वाङ्मय निर्माण होईल का? भवभूतिच्या नाटकांमध्ये तर ती जत्रेत सादर केली जात असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जत्रेतला प्रेक्षक म्हणजे समाजातल्या सर्व थरांमधले लोक असतात. या लोकांच्या दैनंदिन व्यवहारात नसलेल्या भाषेतली नाटकं लोक जत्रांमधून पाहतील का?

 

‘संस्कृत ही मृत भाषा आहे’ हे असेच एक शास्त्रीय पण अर्धसत्य विधान आहे. ‘ज्या भाषेचा एक ही मातृभाषक जीवंत नाही ती भाषा मृत मानली जाते’ या भाषाशास्त्रीय तत्त्वापुरतीच या विधानाची सत्यता सीमित आहे. व्यवहारात आजही नकळतपणे विशिष्ट उद्देशांसाठी संस्कृत भाषेचा प्रयोग होत असतो. केवळ भारतातच नव्हे तर आशियातील अनेक देशांत दैनंदिन म्हंटले जाणारे “शुभं करोति कल्याणम्” सारखे श्लोक, म्हणताना किंवा वंदे मातरम्, जन गण मन म्हणताना हे संस्कृत आणि आधुनिक भाषांचं बेमलुम मिश्रण आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. अगदी अर्धशिक्षित माणसं सुद्धा बोलता बोलता संस्कृतातल्या सुभाषितातील एखाद्या चरणाचा अपभ्रष्ट स्वरुपात म्हणीसारखा वापर करतात. भाषेचा हा व्यवहारातील प्रयोग भाषाशास्त्रज्ञांना मान्य नाही का? तो नैसर्गिक नाही का? की निव्वळ एका व्याख्येत बसत नाही म्हणून त्याकडे कानाडोळा करायचा? दुसरीकडे संस्कृत ही मृतभाषा ठरू नये यासाठी आपण तिचे मातृभाषक आहोत हे सांगावे म्हणून किंवा ती राष्ट्रभाषा व्हावी म्हणून मध्यंतरी चळवळी झाल्या, अजूनही होतात. मातृभाषक असणे हे अशाप्रकारे सांगून सिद्ध होत नाही आणि त्यातून काही साध्यही होत नाही. अश्या चळवळींनी व्यावहारिक पातळीवर फार काही साध्य होत नसते.

 

संस्कृताचे  आणखी एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ती प्राचीन दक्षिण आशियाची ‘ज्ञानभाषा’ होती. गेल्या तीन चार शतकांपासून इंग्रजीमध्ये ज्ञानाच्या सर्वच शाखांशी संबंधित असे विपुल वाङ्मय निर्माण झाले. परिणामी आपोआपच तिचे महत्त्व वाढले. ती ‘ज्ञानभाषा’ आहे. त्यामुळेच ती अर्थार्जनाची भाषा आहे. संस्कृत भाषेने देखील नेमके हेच कार्य काहीशे वर्षांपुर्वी केले. संस्कृतात जेवढी काव्य, नाटकं आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात विविध शास्त्रांशी संबंधित ग्रंथसंपदा आहे. डेक्कन महाविद्यालयाचा एक महाकाय संस्कृत कोश प्रकल्प आहे. ह्या कोशासाठी स्रोत म्हणून जवळपास १५४० संस्कृत ग्रंथांचं संकलन केलं आहे. ह्या ग्रंथांमध्ये जे विषय आहेत त्यांची विभागणी ६२ वेगेवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये केली आहे. विविध शास्त्रे आणि कला ह्यांच्याशी संबंधित एवढी ग्रंथसंपदा संस्कृत भाषेत आहे. त्यात छंदशास्त्रापासून ते आधुनिक काळातील व्यवस्थापनशास्त्राशी देखील संबंध जोडता येईल असं लिखाण आहे. यासाठीच आज अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये संस्कृताचा अभ्यास केला जातो. आपण नेमके इथेच मागे पडतो. याचं कारण शालेय स्तरावर संस्कृत भाषा जशी ‘प्रोजेक्ट’ केली जाते त्यात दडलय. शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात असं बिंबवलं जातं की संस्कृत म्हणजे ‘स्कोअरिंग भाषा’. संस्कृतचा अभ्यास म्हणजे मुख्यतः व्याकरणाचा अभ्यास. यामुळे तिचे ‘ज्ञानभाषा’ हे स्वरुप विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही. ते दहावीला ‘स्कोअर’ करतात आणि संस्कृतचा अभ्यास सोडून देतात. संस्कृताचा अभ्यास करण्याची खरी गरज महाविद्यालयीन आणि संशोधन स्तरावर आहे. रुपे ओळखा, संधी सोडवा असल्या प्रश्नांपेक्षा शास्त्रीय ग्रंथ अध्ययनाच्या केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. पण शालेय स्तरावर हे शक्य नसते, कनिष्ठ महविद्यालयात आपण विविध मार्गांनी सगळ्याच भाषांचा गळा घोटून टाकला आहे आणि एवढे झाल्यावर एखाद्या  विद्यार्थ्याला पुढे संस्कृत विषय घेण्याची इच्छा झालीच तर ती निव्वळ ‘भाषा’ आहे म्हणून विज्ञान शाखेला ती उपलब्ध नाही. भाषा हे माध्यम आहे आणि अभ्यास हा त्या भाषेत लिहिलेल्या रसायन, भौतिकशास्त्र इ. ज्ञेय विषयाचा करायचा आहे हे आपले धुरीण लक्षातच घेत नाहीत. त्यामुळे कला शाखेच्या विद्यार्थ्यांना विषय कळत नाही म्हणून आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध नाही म्हणून या शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास मागेच पडतो. आज एकीकडे संस्कृत लोकप्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे केल्याने काही संस्कृत ही जनसामान्यांची भाषा होणे शक्य नाही हे वास्तव आहे, ते आपण स्वीकारले पाहिजे. आणि संस्कृताचे ‘ज्ञानभाषा’ हे वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवून देखील प्रयत्न केले पाहिजेत.

 

याची सर्वाधिक जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या विद्यापीठीय स्तरावर या दृष्टीने प्रयत्न होतात, पण मर्यादित स्वरूपात. संस्कृतातील संशोधनाचा मुख्य भर वेद, वेदान्त, इतर अधिभौतिक ज्ञानशाखांवरच असतो. इतर विषयाच्या विद्वानांना विभागात बोलावून संस्कृतच्या विद्यार्थ्यांच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न अधिक प्रमाणात व्हायला हवा. परदेशात अत्यंत आधुनिक दृष्टीने संस्कृताचे अध्ययन होत असताना आपले विद्वान त्यांच्याच कोशात (हरप्रकारच्या) गुरफटलेले दिसतात. हे संस्कृत भाषेचे वास्तव आहे आणि ते बदलण्याची गरज आहे.

 

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of Mimamsa: An Indic Inquiry

Author: डॉ. प्रसाद भिडे

May 07, 2020

डॉ. भिडे हे क. जे सोमैय्या महाविद्यालय, मुंबई येथे संस्कृतचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आय.आय.टी. मुंबईच्या मानव्यविद्या विभागातून पी.एच.डी केली आहे.

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *