Darśana literally means ‘an instrument of realization.’ This pillar deliberates upon Philosophical, Theological and Spiritual thoughts which were imparted, flourished and practiced in India from time to time.
विद्या बोकारे | June 08, 2020 | 0 Comments | 3 Min.
श्रीकृष्णशिष्टाई विफल झाल्यानंतर कौरव व पांडव यांच्यामध्ये महाभारत हे युद्ध निश्चित झाले. श्रीकृष्णानंतर परशुराम, कण्वमुनी व इतरही काही मुनिश्रेष्ठांनी दुर्योधनाला समजविण्याचा प्रयत्न केला. पण दंभ व अहंकार यांनी युक्त असलेल्या दुर्योधनाला कोणाचेच म्हणणे पटले नाही. मदान्ध अशा त्याने
न भयाद् वासुदेवस्य न चापि तव फाल्गुन।
राज्यं प्रतिदास्यामि युध्यस्व सहकेशवः॥
“हे अर्जुना! (महाभारतात अर्जुनाला दुर्योधनाने बऱ्याच ठिकाणी फाल्गुन असे संबोधले आहे.) मी श्रीकृष्ण किंवा कोणाच्या भयाने राज्य परत करणार नाही. तेव्हा तू श्रीकृष्णाबरोबर येऊन युद्ध कर. “
पुढे तो म्हणतो- “अमोघ अशा बाणांनी युक्त असणाऱ्या माझ्यासमोर येऊन हजारो श्रीकृष्ण व शेकडो अर्जुन पळून जातील.” दुर्योधनाची दर्पोक्तीच त्याच्या अधःपतनाला कारणीभूत ठरली. संस्कृतचे एक महाकवी भारवी यांचे याबाबतीत एक मार्मिक वचन आहे -
सहसा विदधीत न क्रियाम्
अविवेकः परमापदां पदम्
वृणुते हि विमृश्यकारिणं
गुणलुब्धाः स्वयमेव सम्पदः
“कोणतीही क्रिया ही विचार न करता अविवेकाने करू नये, कारण अविवेक हा फार मोठ्या संकटाचे स्थान असतो. संपत्ती म्हणजे येथे वीरश्री किंवा यशश्री- जी गुणांवर भाळलेली असते व ती अशाच वीर, यशस्वी पुरुषालाच माळ घालते.” थोडक्यात काय तर ते यश असो किंवा धन असो ते गुणसंपन्न अशाच पुरुषाकडे असते. दुर्योधन गुणहीन होता असे मुळीच नाही. दुर्योधनासाठीही महाभारतात व्यासांनी महामना व परन्तप अशी विशेषणे वापरली आहेत. तो महान योद्धा होता. अनुकूल तसेच प्रतिकूल काळातही तो ताठ मानेनेच जगला. महाभारत युद्ध हे एकूण अठरा दिवस चालले. सतरा दिवस युद्ध झाल्यानंतर कौरवसेनेतील जवळपास सर्वच महारथी भीष्म, द्रोण, कर्ण यांना वीरमरण आले आहे. अशावेळेला कृपाचार्य दुर्योधनाकडे येतात व म्हणतात- दुर्योधना, तू स्वतःचे रक्षण कर. सर्व योद्धे वीरगतीला प्राप्त झाल्यावर आपल्या मित्राच्या प्रेमापोटी कृपाचार्य दुर्योधनाला पांडवांशी संधी करण्याचा सल्ला देतात. तेव्हा तो म्हणतो-
स्वस्रीयं निहतं श्रुत्वा दुःखं स्वपीति केशवः।
कृतागसो वयं तस्य स मदर्थं कथं क्षमेत्॥
“आपल्या भाच्याला म्हणजे अभिमन्युला नीतीने आम्ही ठार मारले नाही, याविचारांनी श्रीकृष्ण सुखाने झोपू शकत नाही. आम्ही त्याचे अपराधी आहोत, तो आता आम्हाला कसा क्षमा करेल”. दुसरे असे की तो म्हणतो ‘नायं क्लीबयितुं कालः संयोद्धुं काल एव नः’- ही काही शेपूट वाकवून शरण जाण्याची वेळ नव्हे तर चांगल्याप्रकारे वीरवृत्तीची पताका उभारीत बाणेदारपणे लढण्याची वेळ आहे.
यावरून हेच दिसून येते की दुर्योधन हा जरी दुष्टात्मा असला तरी तो वीरयोद्धा होता. आत्मसन्मानाने जगणारा, आल्या प्रसंगाला धैर्याने सामोरा जाणारा वीरपुरुष होता. वस्तुतः त्याचे सर्व अतिरथी महारथी धाराशयी झाल्यावरही विजयश्री खेचून आणण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणारा पुरुष होता. दुर्योधनाबद्दल इतके सविस्तर सांगण्याचे कारण एवढेच की दुर्योधन म्हटले की आपल्यासमोर अतिशय धूर्त, कपटी, दुष्ट अशी एक प्रतिमा येते. पण प्रत्येकच व्यक्तिमत्त्वाचे चांगले तसेच वाईट असे दोन कंगोरे असतात. दुर्योधनाचेही तसेच होते. त्याला आपल्या बांधवांचा नाश झाल्यावर त्यांच्याशिवाय राज्य बिलकूल उपभोगायचे नव्हते. उलट शेवटची निकराची झुंझ देऊन स्वर्गप्राप्ती करून घ्यायची होती म्हणजेच दुर्योधन स्वार्थी नव्हता. पण अविवेकाने त्याचा नाश केला. अशा या दुर्योधनाचे व अर्जुनाचे युद्ध होणार होते. दुर्योधन सत्तेने मदान्ध होऊन दर्पाने पांडवांना त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना बोलत होता. तेव्हा अर्जुनाने त्याला उत्तर दिले, ‘हे दुर्योधना, तुझ्या सगळ्या दर्पोक्तीचे मी उद्या सकाळी माझे जे गांडीव धनुष्य आहे त्याने उत्तर देईन. कारण केवळ बोलण्याने उत्तर देणारे नपुंसक असतात. त्याचवेळेला एरवी अतिशय शांत असणारे धर्मराज युधिष्ठिरही अतिशय संतप्त झाले.
‘अतिलोहितनेत्राभ्यां आशीविष इव श्वसन्।‘
रागाने त्यांचे नेत्र लाल झाले व विषधर सर्पाप्रमाणे श्वासोच्छ्वास घेऊ लागले. असा महाभारतात उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्णांनीही दुर्योधनाला निरोप पाठवाला की सुयोधन (भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला नेहमी सुयोधन असे संबोधीत)- तू जर असे समजत असशील की मी फक्त अर्जुनाचे सारथ्यच करीन व युद्ध करणार नाही म्हणून तू मला घाबरत नसशील, तर लक्षात ठेव. अग्नी गवताचा निःशेष नाश करतो त्याप्रमाणे मी सर्व राजांना माझ्या क्रोधाग्नीने जाळून टाकीन. पण तशी वेळ युद्धाच्या अंतापर्यंत माझ्यावर येऊ नये. युधिष्ठिराच्या विनंतीप्रमाणे अर्जुनाचे सारथ्य करावयाचे ठरवले आहे. तेव्हा तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे अर्जुनाचा रथ पोहोचलेला असेल. अशाप्रकारे दोन्हीकडच्या तुल्यबळ वीरांनी ललकारी दिली. व महाभारत् युद्ध अटळ झाल्याचा जणू तो शंखनादच होता.
महाभारत युद्धाच्या प्रारंभीच भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आहे. तो आपण यथावकाश बघूच. पण या युद्धाची पार्श्वभूमी पाहणेही तेवढेच गरजेचे असते. ते या श्लोकाच्या आधाराने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS
June 08, 2020
सौ. विद्या बोकारे ह्या भारतीय तत्वज्ञान आणि धर्म यांच्या अभ्यासक आहेत.