Darśana | दर्शन

Darśana literally means ‘an instrument of realization.’ This pillar deliberates upon Philosophical, Theological and Spiritual thoughts which were imparted, flourished and practiced in India from time to time.

श्रीकृष्ण आणि अर्जुन गीता-संवाद – लेख दुसरा

विद्या बोकारे |  June 15, 2020  |  0 Comments | 3 Min.

यत: श्रीकृष्ण: ततो जय: 

 

मागच्या लेखात आपण पाहिले, कृष्णशिष्टाई विफल झाल्यामुळे महाभारत युद्ध होणार हे निश्चित झाले होते. वस्तुत: कृष्णशिष्टाई हा एक औपचारिक भाग होता. दुर्योधनाचे आतापर्यंतचे आचरण बघता तो भगवान श्रीकृष्णांनाही बधणार नाही हे सर्वांना ठाऊक होते. त्यातही अगदी कृष्णशिष्टाईला निघतांना “दुर्योधनाच्या मांडीच्या रक्तानेच मी आपले केस धुवीन, तेव्हाच ते केस बांधीन, तोपर्यंत मोकळेच ठेवीन”, अशी प्रतिज्ञा केलेली द्रौपदी श्रीकृष्णाकडे येते व आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची व प्रतिज्ञेची श्रीकृष्णाला आठवण करून देते. त्यावर भगवंत म्हणतात-

 

सत्यं ते प्रतिजानामि कृष्ण बाष्पो निगृह्यताम्। 

हतमित्राञ्श्रिया युक्तानचिराद् द्रक्ष्यसे पतीना॥

(महाभारत, उद्योगपर्व ८२/४९)

 

 हे कृष्णा (द्रौपदीचे दुसरे नाव) तू अश्रू ढाळणे बंद कर. तुझे सर्व शत्रू मारले गेले आहेत व तुझे पती राज्यलक्ष्मीने संपन्न झाले आहेत. हे तू लवकरच बघशील अशी मी सत्य प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारे आपल्या प्रियसखीची प्रतिज्ञा. 

 

‘तव कृष्णा प्रिया सखी’ (कृष्णा मी तुझी प्रियसखी आहे, असे द्रौपदीचे वचन आहे) असे पूर्ण करण्याचे वचन भगवान श्रीकृष्णाने दिल्याने युद्ध अटळ ठरले. दोन्ही बाजूंचे सैन्य रणांगणावर जमा होऊ लागले. पांडवांच्या सेनेचा प्रमुख  धृष्टद्युम्न म्हणजे द्रुपद राजाचा मुलगा होता. तर कौरवांच्या सेनेचे सेनापती भीष्माचार्य होते. 

 

राजा धृतराष्ट्र अतिशय चिंतामग्न होऊन बसले होते. आपल्या मुलांच्या स्वार्थी वागण्यामुळे आज ही वेळ आली आहे, असे धृतराष्ट्राला वाटत असताना महर्षी व्यास एकांतात धृतराष्ट्राकडे येतात व म्हणतात-

 

राजन् परीतकालस्ते पुत्राश्चान्ये च पार्थिवा:।

ते हिंसन्तीव संग्रामे समासद्येतरेतरम्॥ 

(महाभारत भीष्मपर्व जम्बूखण्डनिर्माणपर्व २/४)

 

हे राजा, तुझ्या पुत्राचा त्याचप्रमाणे अन्य राजांचा मृत्युकाळ जवळ आलेला आहे. ते युद्धात एक दुसऱ्यांना मारण्यास तयार झाले आहेत. हा काळाचा महिमा जाणून तू याविषयी व्यर्थ शोक करू नकोस.

 

पुढे ते म्हणतात- ‘जर तुला हे युद्ध बघण्याची इच्छा असेल तर मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. तू इथे बसल्या बसल्या युद्ध पाहू शकशील.’ (राजा धृतराष्ट्र हे जन्मताच अंध होते. हे सर्व विदितच आहे.) त्यावर राजा धृतराष्ट्र म्हणतात-

 

युद्धमेतत् त्वशेषेण श्रुणुयां तव तेजसा। 

(महाभारत भीष्मपर्व जम्बूखण्डनिर्माणपर्व २/७)

 

मला माझ्याच कुटुंबीयांचा नाश पाहणे बरे वाटत नाही. पण आपल्या कृपेने युद्धाचा इत्थंभूत वृत्तांत मला ऐकायचा आहे. राज्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी महर्षी व्यासांनी संजयला दिव्यचक्षु प्रदान केले. (संजय हा  धृतराष्ट्राचा मंत्री व सल्लागार होता. त्याचप्रमाणे त्या काळी पुराण सांगणारे गवल्गण नावाचे प्रसिद्ध पुराणिक होते. त्यांचा हा मुलगा संजय.) संजयाला दिव्यदृष्टीचा वर देताना महर्षी व्यास म्हणाले -

 

‘हे राजा, हा संजय दिव्यदृष्टीने संपन्न होऊन तुम्हाला युद्धाचा इत्थंभूत वृत्तांत सांगेल. युद्धात घडलेली प्रकट, अप्रकट, रात्री वा दिवसा घडलेली, इतकेच काय कुणाच्या मनात काय चालले आहे, हे सुद्धा हा जाणू शकेल व तुम्हाला सांगेल.

 

याला कुठलेही शस्त्र तोडू शकणार नाही किंवा कोणत्याही परिश्रमाने हा थकणार नाही. युद्धात हा अजिंक्य राहील व युद्धाचा सर्व वृत्तांत तुम्हाला ऐकवीत राहील. तेव्हा हे नरश्रेष्ठा, हे विधिलिखित आहे. ते कोणीही चुकवू शकणार नाही. म्हणून तुम्ही शोक करणे सोडून द्या. कारण

 

‘यतो धर्मस्ततो जय:’ 

जेथे धर्म आहे तेथेच विजय आहे.

 

अशाप्रकारे महर्षी व्यास युद्धाची अटळता राजा धृतराष्ट्राला सांगतात. तिकडे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर युद्धभूमीवर येतात व कौरवांची प्रचंड सेना पाहून अतिशय शोकमग्न होतात. पितामह भीष्मांच्या सेनापत्याखाली केलेली कौरवांच्या सेनेची व्यूहरचना पाहून अतिशय निस्तेज  होऊन ते अर्जुनाला म्हणाले,

 

धनञ्जय कथं शक्यमस्माभिर्योद्धुमाहवे। 

(महाभारत, भीष्मपर्व २१/३)

 

अरे धनंजया, आपण या कौरवांच्या सेनेसोबत युद्धात कसे लढू शकू? 

त्यावर अर्जुन म्हणतो, 

‘अधर्म, लोभ, मोह या दुर्गुणांचा त्याग करून जे  उद्यमाचा आश्रय घेतात त्यांच्यासाठी विजय हा पक्का आहे.’ 

महर्षी व्यासांप्रमाणे अर्जुनही म्हणतो, 

‘यतो धर्मस्ततो जय:’

एवढेच काय जेव्हा युद्धाच्या पूर्वी दुर्योधन आशीर्वाद घ्यायला माता गांधारीकडे जातो, तेव्हा तीसुद्धा हेच म्हणते,

 ‘यतो धर्मस्ततो जय:’

अर्जुन मात्र पुढे युधिष्ठिराला म्हणतो,

एवं राजन् विजानीहि ध्रुवोsस्माकं रणे जय:।

यथा तु नारद: प्राह यत: कृष्ण: ततो जय:॥

(महाभारत, भीष्मपर्व २१/१२)

 

हे राजा, आपण हे पक्के लक्षात ठेवा, युद्धात आपला विजय अवश्यंभावी आहे. कारण ‘जेथे कृष्ण आहे तेथेच विजय आहे.’

 

अर्जुनाला आता धर्माची व्याख्या या सगळ्या गोष्टी गौण  वाटतात. त्यांच्या मनाने एकच निश्चय केलेला आहे, जेथे भगवान श्रीकृष्ण, तेथेच विजय! असा हा अर्जुन संपूर्ण तयारीनिशी अतिशय आत्मविश्वासाने युद्धभूमीवर कूच करतो. महाभारताच्या भीष्मपर्वातील तिसरे उपपर्व हे भगवद्गीतापर्व आहे. या पर्वाचा प्रारंभ भीष्मांच्या मृत्यूच्या प्रस्तावनेने होतो. मूळ संवाद जरी राजा जनमेजय व महर्षी वैशंपायन यांच्यातला असला तरी भगवद्गीतेत संजयच धृतराष्ट्राला इतिवृत्तांत कथन करताना दिसतो. परंतु मुख्य संवाद हा स्वतः भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातला आहे.

 

Views expressed in the article are of the author and does not necessarily reflect the official position of MFIS

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *