Itihāsa | इतिहास

Itihāsa literally means “so indeed it was”. This pillar delves into variety of historical narratives about India and brings out authentic and well researched Indian Perspectives on Indian History.

शहाजीराजे भोसले यांचा पराक्रम आणि मुत्सद्देगिरी- पूर्वाद्ध

पांडुरंग बलकवडे |  May 07, 2022  |  0 Comments | 3 Min.

बहामनी राज्याची शकले होऊन त्यातून आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, फारुखशाही या पाच शाह्यांची निर्मिती झाली. या पाचही शाह्या आपापसात कायम लढत होत्या. त्यांच्या या संघर्षात त्यांना लढणाऱ्या सैनिकांची उणीव भासू लागली. त्यामुळे त्यांनी स्थानिक हिंदूंची सैन्यदलात भरती सुरू केली. यातूनच काही कर्तृत्ववान व्यक्ती आणि घराणी उदयाला आली. भोसले घराणे त्यापैकी एक होत. बाबाजी हा या घराण्याचा ज्ञात पहिला कर्तृत्ववान पुरुष होय. बाबाजी वेरूळचा पाटील होता. बाबाजीने निजामशाहीत नोकरी पत्करली असावी. बाबाजीला मालोजी व विठोजी असे दोन पुत्र होते. हे दोघेही महापराक्रमी निघाले. मालोजी व त्याचा भाऊ विठोजी हे एकविचाराने वागत होते. त्यामुळे या दोघांना मिळालेली वतने, इनामे व जहागिऱ्या समसमान होत्या.
 
फलटणचा देशमुख वणगोजी नाईक- निंबाळकर यांची बहीण उमाबाई हिचे लग्न मालोजीबरोबर झाले होते. मालोजीला शहाजी व शरीफजी असे दोन पुत्र झाले. तर विठोजीस संभाजी, खेळोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी, बकाजी व मालोजी असे आठ पुत्र झाले. निजामशहाच्या आदिलशाहीविरुद्धच्या युद्धमोहिमेमध्ये झालेल्या इंदापूरच्या युद्धात मालोजी मृत्युमुखी पडले. त्यावेळी शहाजीराजे फक्त पाच वर्षांत होते. मालोजीने शिखर शिंगणापूरला मोठा तलाव बांधून लोकांना पाणी उपलब्ध करून दिले होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराजवळ एक विहीरही मालोजीने बांधली होती. मालोजीच्या पश्चात् विठोजीनेच शहाजींचा सांभाळ केला.

 

बिकानेरच्या अनप ग्रंथालयात सापडलेल्या जन्मटिप्पणीवरून शहाजींचा जन्म संवत् १६५५ च्या फाल्गुन वद्य १४  गुरुवारी झाला. त्याची इंग्रजी तारीख १६ मार्च १५९९ ही येते. शहाजी दहा अकरा वर्षांचे झाले असता निजामशाहीतील बलाढ्य सरदार लखोजी जाधवराव यांची कन्या जिजाऊ हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. जिजाऊंपासून शहाजींना शिवाजी व संभाजी दोन पुत्र प्राप्त झाले. तर धाकटी पत्नी तुकाबाई हिच्यापासून व्यंकोजी हा पुत्र झाला.

 

भातवडीची लढाई  

 

अहमदनगरजवळ भातवडी येथे ३१ ऑक्टोबर १६२४च्या सुमारास निजामशहाचे आणि आदिलशहाचे सैन्य यांच्यात मोठे युद्ध झाले. या युद्धात मलिक अंबरच्या हाताखाली लढणाऱ्या शहाजींनी पराक्रमाची शर्थ केली. पराक्रमाबरोबरच शहाजींनी या ठिकाणी एक युक्ती लढवली होती. युद्धाअगोदरच्या रात्री शहाजींनी आदिलशाही सैन्य ज्या नदीच्या पात्रात तळ ठोकून होते त्या नदीच्या वरच्या भागात बांधलेले मोठे धरण फोडले. त्यामुळे आलेल्या पुरात आदिलशहाच्या फौजेचे प्रचंड नुकसान झाले होते.

 

त्यानंतर हल्ला करून शहाजीने आदिलशाही फौजेचा धुव्वा उडवला. त्यामुळे सर्वत्र शहाजींची कीर्ती पसरली. या लढाईत शहाजींचे धाकटे भाऊ शरीफजी मारले गेले. आपण पराक्रमाची शर्थ गाजवून निजामशाहीला विजय प्राप्त करून दिला. परंतु निजामशहाने याची योग्य दखल घेतली नाही. याचा राग येऊन शहाजी आदिलशाहीच्या सेवेत गेले. आदिलशहाने त्यांना ‘सरलष्कर’ हा बहुमानाचा किताब बहाल केला. इ. स. १६२७च्या सप्टेंबरमध्ये दुसरा इब्राहीम आदिलशहाचे अकाली निधन झाले. त्याच्या जागेवर आलेला त्याचा पुत्र मुहम्मद आदिलशहा हा शहाजींचा द्वेष करीत असल्याने इ. स. ‍१६२८ च्या आरंभी आदिलशाही सोडून शहाजी पुन्हा निजामशाहीत आले.

 

 २८ ऑक्टोबर १६२७ रोजी मुघल बादशहा जहांगीर मृत्यू पावला. बापाच्या मृत्यूची बातमी समजल्यावर दक्षिणेत जुन्नरला असलेला शहजादा शहाजहान उत्तरेकडे निघाला. त्यामुळे मोगलांनी निजामशाहीविरुद्ध सुरू केलेली आघाडी शिथिल झाली. मुघलांनी जिंकून घेतलेला निजामशाहीचा प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याची संधी आहे असा विचार करून निजामशहाने शहाजींना आपल्या गोटात निमंत्रित केले होते. २५ जुलै १६२८ रोजी शहाजी निजामशाहीच्या सेवेत आले. त्या वेळेस मुर्तुजा निजामशहा दुसरा हा गादीवर होता. तो फार संशयी व विक्षिप्त होता. २५ जुलै १६२९ रोजी या निजामशहाने भर दरबारात शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधवराव, त्यांचे दोन पुत्र अचलोची व रघोजी आणि नातू यशवंतराव यांची क्रूरपणे हत्या केली. यामुळे नाराज झालेले शहाजीराजे आपल्या जहागिरीवर निघून आले. दरम्यान याच काळात शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी शिवाजीराजांचा  १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला. १७ जून ‍१६३३ रोजी मुघल सरदार महाबतखान याने देवगिरी उर्फ दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला व सुलतान हुसैन शहा व त्याचा वजीर फतेह खान यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत टाकले. अशा पद्धतीने निजामशाहीचा अंत झाला. परंतु शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुर्तुजा तिसरा या लहान मुलाला मांडीवर घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील पेमगिरीच्या किल्ल्यावर त्याला निजामशाहीचा सुलतान म्हणून घोषित केले व निजामशाहीचे पुनर्निर्माण केले. अशापद्धतीने संपूर्ण निजामशाही आपल्या पंखाखाली आणली. अनेक पराक्रम व होतकरू मराठा तरुणांना आपले नशीब काढण्याची ही चांगली संधी आहे असे वाटून ते शहाजीराजांना येऊन मिळाले.
 
निजामशाहीच्या रक्षणासाठी शहाजीराजांचा संघर्ष
 
शहाजी राजांसारख्या एका बंडखोर हिंदू योध्याने शेकडो वर्षांची एक इस्लामिक सल्तनत निजामशाही ताब्यात घेतली आहे हे वर्तमान शहाजहानला समजताच त्याने आपला सेनापती महाबतखान याला त्यांच्याविरुद्ध जय्यत तयारीनिशी रवाना केले. सुलतान मुहम्मद आदिलशहास आज्ञापत्र पाठवून शहाजीराजांविरुद्ध  उठविले. एकाच वेळी मुघल आणि आदिलशहा यांच्या एकत्रित फौजांविरुद्ध शहाजीराजांनी अनेक दिवस मोठा संघर्ष केला. पेमगिरीवर निजामशहाचा वारस ठेवणे असुरक्षित वाटल्याने शहाजी राजांनी त्याला घेऊन ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्यावर आश्रय घेतला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने माहुली किल्ल्याला वेढा दिला. शहाजीराजांनी अनेक दिवस हा किल्ला लढविला. परंतु शत्रूच्यव प्रचंड सामर्थ्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यांनी तहाचा प्रस्ताव पाठविला. त्याप्रमाणे तह होऊन त्यांना निजामशहाच्या वारशाला मुघलांच्या स्वाधीन करावे लागले व त्यांना आदिलशहाची चाकरी स्वीकारावी लागली. अशापद्धतीने निजामशाहीच्या अस्तानंतर शहाजी राज्यांच्या पूर्वायुष्याचा भाग येथे संपला.

 

निजामशाहीच्या रक्षणाच्या निमित्ताने शहाजीराजांनी नवीन राज्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला होता. हा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी एकाच वेळी आदिलशाही आणि बलाढ्य मोगल सत्तेशी संघर्ष करणार्‍या शहाजी राजांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली. एक महापराक्रमी आणि तेवढाच मुत्सद्दी मराठा योद्धा असा त्यांचा नवलौकिक झाला होता.

Author: पांडुरंग बलकवडे

May 07, 2022

श्री बलकवडे हे ज्येष्ठ इतिहासकार आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ह्याचे ते सचिव आहेत.

Post Comment

Your email address will not be published. Required fields are marked *