Darśana literally means ‘an instrument of realization.’ This pillar deliberates upon Philosophical, Theological and Spiritual thoughts which were imparted, flourished and practiced in India from time to time.
लक्ष्मीकांत जोशी | June 02, 2020 | 0 Comments | 3 Min.
आपल्या कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयी किंवा काळरुपी कातळावर स्वतःच्या कर्तृत्वाची कायमची मोहोर उमटवणाऱ्या धीरोदात्त नेतृत्वाविषयी नेहमीच काही ना काही गूढ शिल्लक राहते. भारतच नव्हे तर जगातील इतिहासाबाबत हाच अनुभव येतो अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास शतकानुशतके चालू राहतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व, ज्यांच्याविषयी किती अभ्यास केला तरी नव्याने अनेक पैलू समोर येत राहतात. सावरकर उत्तम साहित्यिक होते, नाटककार होते, कवी होते, पत्रकार होते. इतिहासाचा प्रचंड अभ्यास असलेले व्यासंगी होते. यासारखी कितीतरी विशेषणे सावरकरांना लावली गेली. त्यांचे देशप्रेम, त्याग याविषयी तर शब्द अपुरे पडावेत, इतके त्यांचे समर्पण विलक्षण स्वरुपाचे आहे. कुतुहल असे निर्माण होते की अशा प्रकारची सर्वगुणसंपन्नता किंवा पराकोटीची प्रतिभा, प्रज्ञा, विवेकशीलता, दूरदृष्टी ही सगळी या एकाच व्यक्तिमत्त्वात येण्याचे कारण काय असावे. अनेक वेळेला तर सावरकरांचा तो प्रचंड त्याग पाहून आणि देशाविषयी त्यांनी केलेले चिंतन लक्षात घेऊन ते एक ईश्वरी अवतार होते असे म्हणण्यापर्यंत अनेक जण आपला आदर व्यक्त करतात आणि तो खराही वाटू लागतो. परंतु अनुमान प्रमाणाचा विचार केला तर काही यथार्थता समोर येते. ज्याप्रमाणे अनुमान प्रमाणानुसार जिथे जिथे धूर दिसत असेल तिथे तिथे वह्नी, अग्नी असावा असा अंदाज बांधला जातो. आणि तो यथार्थही असतो. सावरकरांच्या या सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा किंवा त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा वेध घेताना त्याच्या मुळाशी एक आध्यात्मिक शक्ती असली पाहिजे, असेच अनुमान काढावेसे वाटते. म्हणजे अगदी टोकाला जाऊन विधान करायचे झाले तर सावरकर विज्ञानवादी होते. पण सावरकर तितकेच आध्यात्मवादीही होते, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. किंबहुना त्यांचा हा एक पैलू तितकासा लक्षात घेतला गेलेला दिसत नाही. तो अभ्यासला गेला नाही. त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यासारखे जाणवते.
अनेकांना आध्यात्मवादी सावरकर हे विधानच पचनी पडणार नाही. परंतु ही काही सावरकरांची मूळ ओळख नाही. सावरकरांची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातला आध्यात्मवादी सावरकर असा एक नवीन पैलूसुद्धा विचारात घेता येऊ शकतो. खरे सांगायचे तर त्यांच्या या सगळ्या प्रचंड कार्याचे स्फुल्लिंग लहानपणी जोपासल्या गेलेल्या आध्यात्मिक प्रवृत्तीत होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सावरकरांच्या घरात अष्टभुजा देवीची पूजा–अर्चा विधीयुक्त पद्धतीने होत असे. पूजा, संध्यादि आन्हिकांचे आचरण केले जात असे. आपल्या मौंजीबंधनानंतर केवळ पाच सहा दिवसात संपूर्ण संध्या मुखोद्गत करणारे सावरकर आणि त्याचवेळी घरातल्या देवघरात बसून देवीसमोर एकाग्र होणारे सावरकर त्यांच्यातल्या बालसुलभपणाचे जरी ते द्योतक असले तरी लहानपणी जोपसला गेलेला हा पिंड नेहमीच ब्रह्मांडाचा विचार करीत राहिला. सावरकरांच्या घरात देवी सप्तशतीचे पाठ अतिशय श्रद्धेने केले जात असत.
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।
देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखम्।
किंवा याच देवी पाठात येणारा
यो मां जयति संग्रामे यो मे दर्पोSपोहति
यो मे प्रतिबलो लोके स मे भर्ता भविष्यति।
हे श्लोक म्हणजे केवळ देवाकडे केलेल्या मागण्या नाहीत. तर याची देही याच जन्मामध्ये त्या प्राप्त करायच्या आहेत. ही जाणीव या श्लोकांमधून वृद्धिंगत होत राहते. ऐकून ऐकून या विनायकाच्या बालमनावर त्याचा प्रभाव पडत गेला आणि सप्तशतीचे अनेक पाठ त्यांनी मुखोद्गत केले. इतक्या लहान वयामध्ये देवी सप्तशतीसारख्या ग्रंथातील श्लोक पाठ होण्याचा काहीतरी परिणाम तर घडून आला असेलच. सावकरांच्या करंदीकरांनी लिहीलेल्या चरित्रामध्ये याचा मोठा सविस्तर उल्लेख केलेला पाहायला मिळतो. एखाद्या साधकाप्रमाणे तन्मय होऊन ते देवीपूजनामध्ये गढून जात असत. एकदा तर त्यांनी देवी भागवताची मराठी पोथी परस्पर मागवून घेतली आणि ती पोथी वाचून झाल्यावर आपण दुर्गादास विजय नावाचा ओवीबध्द ग्रंथ मराठीत लिहावा असे त्यांना वाटू लागले. याविषयीचे वर्णन करताना करंदीकर म्हणतात की राणाप्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या देवीभक्तांची उदात्त चरित्रे सावरकरांच्या वाचनात येऊ लागल्यामुळे या देवीभक्तीचा त्यांच्याही मनावर परिणाम झाला. कालांतराने तर देवीचा अंश आपल्या ठिकाणी आहे असे त्यांना वाटू लागले. याबाबतीतल्या एका प्रसंगाचे मोठे मार्मिक वर्णन वाचायला मिळते. एकदा सावरकरांच्या धाकट्या बहिणीच्या कानातला मोत्याचा दागिना हरवतो. बराच शोध घेऊन तो सापडत नाही. शेवटी हा बालविनायक देवीसमोर एकाग्रतेने बसतो आणि ती देवीची भक्ती सुरु असताना एका फडताळाखाली अंधारामध्ये तो दागिना पडलेला आहे असा त्यांना भास होतो. अर्थातच त्याप्रमाणे तो हरवलेला दागिना नेमका त्याच ठिकाणी सापडतो. हा अगदी काकतालीय न्याय जरी म्हटला तरीसुद्धा त्यांच्या मनात उपजलेल्या भक्तीला नाकारता येणार नाही. भगूरच्या आपल्या शालेय जीवनाच्या काळात त्यांनी उपनिषदे किंवा हाती मिळतील त्या पोथ्या वाचून त्याचा फडशाही पाडला होता. स्वाभाविकपणे वाढत्या वयाबरोबर आणि तत्कालीन देशकालाची परिस्थिती पाहून त्यांच्या मनामध्ये परकीय सत्तेचाही प्रभाव जाणवत राहिला. भगूर सोडण्यापूर्वी त्यांनी केलेली देवीभक्ती भविष्यकाळामध्ये त्याच देवीसमोर शपथ घेण्यासाठीसुद्धा कारणीभूत झाली असे म्हटले तर चुकीचे ठरत नाही. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी ‘मारता मारता मरेतो झुंजेन’ ही त्यांची प्रतिज्ञा त्याच आध्यात्मिक पिंडाचा तितकाच स्वाभाविक परिणाम म्हणता येतो.
सावरकरांनी आपल्या संपूर्ण क्रांतिकार्यामध्ये क्रांतिकारक विचारच व्यक्त केले. त्यात त्यांनी इटली किंवा युरोपीय राष्ट्रांमध्ये झालेल्या अनेक औद्योगिक क्रांतीचे दाखले वेळोवेळी दिलेले आहे. मग अगदी ‘गांडीव धनुष्य भंगले’, ‘मशिन गन्स आल्या’ किंवा ‘लेखण्या मोडा शस्रे हाती घ्या’ यासारखे त्यांचे उद्गार, आवाहन, विचार पाहून त्यांनी शस्त्र आणि विज्ञान यांचा वेळोवेळी पुरस्कार केल्याचेही लक्षात येते. परंतु विचारांमधली ही जाज्ज्वल्यता किंवा धग जिथून निर्माण झाली तो त्यांच्यातील आध्यात्मिक पिंड सहजासहजी दुर्लक्षित करता येत नाही. त्यांच्या मनामध्ये असलेली ही देवीच्या रुपातील शक्तीपूजा त्यांनी आयुष्यभर विविध पद्धतीने केली. त्यांच्या गाजलेल्या सगळ्या कवितांचा छोटासा जरी वेध घेतला तरी त्यातल्या कवी कल्पना किंवा शब्दरचना या त्यांच्यामधल्या शक्तीपूजेचेच किंवा आराधनेचेच वर्णन करतात. मग अगदी ‘जयोस्तुते’ या कवितेमध्येसुध्दा स्वतंत्रतेला देवता मानून त्यांनी केलेली ही काव्यमय पूजा किंवा ‘सागरा प्राण तळमळला’ या काव्यामध्येसुद्धा याच भारतमातेचे सागराकडून होत असलेले पादप्रक्षालन त्यांच्यातल्या मातृभक्तीचे किंबहुना भक्तीसाठी आवश्यक असलेल्या आध्यात्मिकतेचे दर्शन घडवतात. एवढेच नव्हे तर मॅझिनीचे चरित्र लिहीताना त्याच्या प्रस्तावनेतसुद्धा मॅझिनी म्हणजे इटलीचे रामदास आणि रामदास म्हणजे इटलीचे मॅझिनी अशा प्रकारची तुलना ही गोष्टसुद्धा त्यांच्यातल्या मनात दडून बसलेल्या आध्यात्मिकतेचेच प्रत्यंतर ठरते. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात आणि या उत्तुंग व्यक्तीमत्वामध्ये दडलेल्या स्फुल्लिंगाचे गूढही जाणून घेता येऊ शकते.
Views expressed are of thr author’s and do not necessarily represnt the official position of MFIS
June 02, 2020
लक्ष्मीकांत जोशी हे ज्येष्ठ पत्रकार असून गेली ३५ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत..